Nashik Squad Bike : शेतीची सात कामे, दोन टन मालाची वाहतूक करणारी बाईक, नाशिकच्या विद्यार्थ्यांचा अनोखा जुगाड
Nashik Squad Bike : नाशिकच्या (Nashik) विदयार्थ्यांनी शेतीची सात कामे करणारी स्क्वाड बाईक बनवली आहे.
Nashik Squad Bike : नाशिकच्या (Nashik) केके इंजिनिअरिंग कॉलेजच्या विदयार्थ्यांनी शेतकऱ्यांना पूरक अशी स्क्वाड बाईक बनवली असून एक लिटरमध्ये 25 किलोमीटरफिरणारी ही स्क्वाड बाईक आहे. म्हणजेच या 25 किलोमीटर यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीही विविध कामे करता येणार आहेत. कृषीथॉन प्रदर्शनात मोटरसायकलचा प्रयोग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नाशिकच्या ठक्कर डोम परिसरात चार दिवशीय आंतरराष्ट्रीय कृषीथॉनचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या साधनांचे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या प्रदर्शनात नाशिक येथील के के वाघ महाविद्यालयाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ही सुपर बाईक बनवली आहे. आपला भारत देश शेतीप्रधान असून सद्यस्थितीत शेतीत अनेक नवनवीन प्रयोग होत आहेत. यातूनच स्क्वाड बाईकची कल्पना सुचली. अनेक शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी मजुरांची आवश्यकता भासते. मात्र अनेकदा मजुरांचा तुटवडा होत असल्याने काम करणे जिकिरीचे होते. या पार्श्वभूमीवर शेतीसाठी लहान ट्रॅक्टर ऐवजी स्क्वाड बाईकचा उपयोग करू शकतो, आणि तिथून बाईक बनविण्याचे निश्चित केले.
ब्रम्हास्त्र नावाच्या या चमूने या एटीव्ही ऑफरोड वाहनाची प्रतिकृती बनवून प्रत्यक्षात तयार करण्याचे ठरविले. स्क्वाड बाईक तयार करण्यासाठी क्रोमोली स्टीलचे पाइप तसेच अल्युमिनियम आणि बॉडीसाठी पॉलिकार्बोनेट शीट हे साहित्य लागले. त्यानुसार एक स्क्वाड बाईक तयार करण्यासाठी साधारणतः सहा महिन्याचा कालावधी लागला. त्यातील तीन महिने संशोधन व डिसाईन आणि तीन महिने गाडी वर्कशॉपमध्ये तयार करण्यास लागले. स्क्वाड बाईक तयार करण्यासाठी साधारणतः पाच लाख रुपये खर्च आला आहे. समजा भविष्यात या गाडीचे जास्त प्रमाणात उत्पादन सुरू झाले तर अडीच ते तीन लाखांपर्यंत किंमत असेल. स्क्वाड बाईकच्या माध्यमातून या गाडीला विविध उपकरणे संलग्न करून आपण नांगरणी , वखरणी, पेरणी, लावणी, निंदणी, खुरपणी, कापणी असे अनेक शेतीची महत्वाची कामे करू शकतो. तसेच या गाडीचे वजन ओढण्याची क्षमता दोन टन असून त्याचा उपयोग पिकाची वाहतूक करण्यास होऊ शकतो.
अशी आहे स्क्वाड बाईकची रचना
स्क्वाड बाईकला 4 चाके असून पेट्रोल ह्या इंधनावर चालवली जाते. शिवाय गाडीला 25 की.मी. प्रती लिटर असे मायलेज आहे. प्रामुख्याने अशा प्रकारची गाडी ही सर्व प्रकारच्या खडतर परिस्थितीत चालू शकते. उदा. डोंगराळ प्रदेश, खडकाळ प्रदेश. जास्त वजन ओढण्याची क्षमता असल्या कारणाने शेतीमध्ये गाडीचा उत्तम उपयोग होण्याच्या उद्देश सफल होतो. स्क्वाड बाईकच्या माध्यमातून या गाडीला विविध उपकरणे संलग्न करून आपण नांगरणी , वखरणी, पेरणी, लावणी, निंदणी, खुरपणी, कापणी असे अनेक शेतीची महत्वाची कामे करू शकतो. तसेच या गाडीचे वजन ओढण्याची क्षमता दोन टन असून त्याचा उपयोग पिकाची वाहतूक करण्यास होऊ शकतो.या गाडीबद्दल जाणून घेण्यास प्रदर्शनात येणारा प्रत्येक व्यक्ती उत्सुक आहे. तसेच अनेक शेतकरी या गाडीत अजून काय बदल करू शकतो जेणेकरून ही गाडी शेतीस अजून उपयोगी व सोयीस्कर ठरेल याचा सल्ला देत असल्याचे विद्यार्थ्यांच्या चमूने सांगितले.