North Maharashtra Rain : पावसाची दांडी, उत्तर महाराष्ट्राची कोंडी, नाशिकसह इतर जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा कायम, काय आहे स्थिती?
North Maharashtra Rain : अडीच महिने उलटूनही नाशिकसह (Nashik) नंदुरबार, अहमदनगर, धुळे, जळगाव, अहमदमनगर जिल्ह्यात आजही दमदार पाऊस नसल्याचे चित्र आहे.
नाशिक : यंदाच्या पावसाचे अडीच महिने उलटूनही नाशिकसह (Nashik) नंदुरबार, अहमदनगर, धुळे, जळगाव, अहमदमनगर जिल्ह्यात आजही दमदार पाऊस नसल्याचे चित्र आहे. राज्यातील काही भागातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने धरणे भरली. मात्र आजही राज्यातील बहुतांश भाग हा कोरडाच असल्याची स्थिती आहे. यात नाशिक जिल्ह्यासह उत्तरं महाराष्ट्राचा बराचसा भाग हा तहानलेला असून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचा धरणातील सर्व प्रकल्प (मोठे, मध्यम, लघु) साठा एकूण 50.406 टीएमसी आहे. आजच्या स्थितीत 19.45 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला 32.78 टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षी या तारखेपर्यंत 6174.00 मिलीमीटर पाऊस झाला होता. आज या तारखेपर्यंत 3910.10 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या तारखेला सुमारे ६० टक्के कमी पाऊस झाला आहे, असे दिसून येत आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात 23 टक्के जलसाठा होता. अक्कलपाडा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3.04 टक्के जलसाठा कमी झाला आहे. हा साठा फक्त एक महिना पुरेल इतकाच आहे.. जिल्ह्यात मागील वर्षी 159.8टक्के पाऊस झाला होता, यंदा आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 70 टक्के पाऊस झाला असून 361.1 पावसाची अपेक्षा आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याची धरणातील सर्व प्रकल्प साठा एकूण 19 टीएमसी आहे. आजच्या स्थितीत 6 टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला 11 टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षी या तारखेपर्यंत 1100 मिलीमीटर पाऊस झाला होता. आज या तारखेपर्यंत 500 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या तारखेला सुमारे 45 टक्के कमी पाऊस झाला आहे. असे दिसून येत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील वर्षी याच काळात 46.05 टीएमसी (92.53 टक्के) पाणीसाठा होता, जिल्ह्यात आता 38.5 टीएमसी (76.35 टक्के) पाणीसाठा आहे. साधारणतः 8 महिने पुरेल एवढा हा पाणीसाठा असून मागील वर्षी आतापर्यंत 830 मिमी पाऊस, यंदा आतापर्यंत 380 मिमी पाऊस झाला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात एकूण मोठे आणि मध्यम प्रकल्प 6 असून त्याचा एकूण जलसाठा आहे. 91093 टीएमसी, गेल्यावर्षी याच दिवसात 47290 टीएमसी जलसाठा शिल्लक होता. ज्याची टक्केवारी 51.91 टक्के एवढी होती तर यावर्षी एकूण 39106 जलसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी 42.92 टक्के एवढी आहे. अहमदनगर जिल्हा गेल्यावर्षी 232.5मी.मि पाऊस झाला होता ज्याची टक्केवारी 74.02 एवढी होती. यावर्षी 179.1 मि.मी पाऊस 40 टक्के एवढी आहे.
नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता
नाशिक जिल्ह्याचा (Nashik District) विचार केला तर सकाळपासून नागरिकांना उन्ह पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा दिवसही कोरडाच गेल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्प असून अद्यापही अनेक धरणांत पन्नास टक्केसुद्धा जलसाठा नाही. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) भागात पाऊस होत असल्याने गंगापूर धरणसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आजमितीस गंगापूर धरण नव्वद टक्क्यांच्यावर गेले आहे. मात्र अनेक प्रकल्पात अद्यापही पाणी नसल्याने जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आदी तालुक्यातील धरणे तहानलेलीच असून शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाळ्याचे (Rainy Season) दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्याचे चित्र आहे.
इतर संबंधित माहिती :