(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Unseasonal Rain : नाशिकसह जिल्ह्यात चौथ्या दिवशी अवकाळीसह गारपीट, शेतीपिकांत गारांचा खच
Nashik Unseasonal Rain : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
Nashik Unseasonal Rain : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. त्याचबरोबर अनेक भागात पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी हजेरी लावत शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
आज पुन्हा सकाळपासूनच ढगाळ हवामान नाशिकसह जिल्ह्यात (Nashik District) पाहायला मिळाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), हर्सूल, सुरगाणा, पेठ, चांदवड, मनमाड या भागांत मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या पावसाने गहू, हरभरा, कांदा इट रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय जिल्ह्यातील इतर भागातील शेकडो गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला.
दरम्यान त्र्यंबकेश्वर, चांदवड व कळवण तालुक्यात गारांचा पाऊस झाला असून, जिल्ह्यातील बागलाण, देवळा, सुरगाणा, पेठ या तालुक्यांत पावसाने जोरदार बॅटिंग केली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काढणीला आलेल्या कांदा पिकाची हानी होत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शनिवारी जिल्ह्यातील कसमा पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली तर सुरगाणा, अभोणा येथील आठवडे बाजारावर परिणाम झाला. त्यामुळे विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. दिंडोरी परिसरालाही पावसाने झोडपले.
अनेक भागात नुकसान
दरम्यान सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसासह अनेक भागात गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिकांच्या सऱ्यांमध्ये गारांचा खच पडल्याचे पाहावयास मिळाले. अनेक तालुक्यातील घरांवरील पत्रे उडाल्याने घरात साठवलेल्या शेतमाल, तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसेल, असा अंदाज हवामान खात्याने तसेच तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी शेतातील पिके घरात साठवली होती. मात्र, वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरांसह त्या पिकांचेही नुकसान झाले.
आणखी दोन दिवस पावसाचे....
हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.