(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagar Onion News : शेतात या आणि पाहिजे तितका कांदा फुकटात न्या.... कांद्याला दर न मिळाल्याने शेतकरी हताश
Nagar Onion News : रात्रीचा दिवस करून पिकवलेल्या पिकाला कवडीमोल भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या (Farmers) डोळ्यात पाणी आले आहे.
Nagar Onion News : रात्रीचा दिवस करून पिकवलेल्या पिकाला कवडीमोल भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्याच्या (Farmers) डोळ्यांत पाणी आले आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाच्या घरात वापरात असलेला कांदा शेतकऱ्यांना रडवतो आहे. अशातच नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने चार एकरातील कांदा फुकट वाटून दिला आहे. त्यामुळे परिसरासह जिल्ह्यात (Nagar) या शेतकऱ्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव (Onion Rate) घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घसरणाऱ्या दराबाबत रोजच महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. अशावेळी कांदा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा कुणाच्या पोटात गेलेला बरा या हेतूने संगमनेर (Sangamner) तालुक्यातील पिंपरणेतील युवा शेतकरी धनंजय थोरात (Dhanajay Thorat) यांनी काढणीला आलेला चार एकर कांदा चक्क फुकट वाटला. त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने जीव लावून उभा केलेला कांदा काहीच किंमत मिळाली नसल्याने शेतकऱ्यावर वाईट परिस्थिती ओढावली आहे.
एकीकडे घराघरात स्वयंपाकात वापरला जाणारा कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणतो, मात्र सद्यस्थितीला हाच कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी चार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. या लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास दोन लाख अधिक खर्च केला. रात्र दिवस मेहनत घेत, खते बियाणांची चांगली मात्रा मिळाल्याने कांदा पीक बहरात होते. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यातून फायदा होईल, अशी या शेतकऱ्याची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने आवक वाढल्याने भाव कोसळले. उत्पन्न तर सोडा मात्र झालेला खर्चसुद्धा मिळण्याच्या आशा मावळल्याने शेतकऱ्याने परिसरात नागरिकांना चार एकरांवरील कांदा फुकट वाटून दिला.
शिवाय कांदा पिकाला भाव नाही मिळाला म्हणून आता दुसरे पीक घ्यायच्या दृष्टीने चार एकरांवरील कांदा पिकात शेळ्या-मेंढ्या घुसवल्या. तसेच पाहिजे त्याने पाहिजे तितका कांदा मोफत काढून नेण्याचे आवाहन या शेतकऱ्याने केले. त्यामुळे लागलीच परिसरातील पिंपरणे गावासह जोर्वे, कनोली येथील ग्रामस्थांची कांदा काढून नेण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चार एकर कांदा कुठच्या कुठं गेला. कांदा दर घसरल्याने शेतकरी कांदा काढणी देखील टाळत आहेत. कारण मजूर खर्च, ने आण करण्याचा खर्च, हमाली इत्यादींचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीसुद्धा सोडून दिलं आहे. कारण कांदा पिकाला मिळत असलेल्या भावामुळे कुठलाच खर्च निघेनासा झाला आहे. परिणामी सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे.