Nashik Crime : प्राध्यापकांनंतर आता मद्यधुंद रिक्षाचालक, नाशिकमधील प्रवाशासोबत नेमकं काय घडलं?
Nashik Crime : प्राध्यापकांनंतर आता मद्यधुंद रिक्षाचालकाने बेदरकारपणे रिक्षा चालविल्याची घटना घडली आहे.
Nashik Crime : दोन दिवसांपूर्वी मद्यपी चालकाचा धुमाकूळ नाशिक (Nashik) शहराने पाहिला. अनेक जणांना यावेळी देवच आठवला. आता दुसऱ्या एका मद्यपी चालकाने धुमाकूळ घातला आहे. नाशिकरोडहुन (Nashikroad) भरधाव वेगात निघालेल्या रिक्षाचालक स्पीड ब्रेकर न बघताच रिक्षा चालवत असल्याचे समोर आले आहे. शिवाय रस्त्यात रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील वृद्ध जखमी झाला. मात्र घटनेनंतर रिक्षाचालक फरार झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
नाशिक शहरात रिक्षा चालकांची (Auto Rickshaw) मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. रिक्षाचालकाच्या अश्लील वर्तवणूकीमुळे एका मुलीने रिक्षेतून उडी मारल्याची औरंगाबादची (Aurangabad) घटना ताजी असतांनाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या नाशिकरोड परिसरातील ही घटना आहे. या ठिकाणाहून शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर जाण्यासाठी एका 65 वर्षीय वृद्धाने स्पेशल ऑटोरिक्षेची बुकिंग केली होती. मात्र रिक्षाचालक नाशिकरोड हुन निघाल्यानंतर भरधाव वेगाने रिक्षा चालविल्याने एका स्पीड ब्रेकरवर रिक्षा उलटली. यात वृद्ध गंभीर जखमी झाला. तर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळाला.
झालं असं कि, नाशिक रॉड रेल्वे स्टेशनवर एक वृद्ध उतरल्यानंतर त्याने नाशिकरोडहून स्पेशल ऑटोरिक्षेची बुकिंग केली होती. नाशिकरोडहुन ते बसल्यानंतर हिंदी भाषिक असलेल्या रिक्षा चालक रिक्षा भरधाव वेगात पळवण्यास सुरवात केली. अशातच रिक्षा वेडी वाकडी देखील चालवत होता. रस्त्यात अनेकांना त्याने कटही मारला होता. यावर वृद्धाने रिक्षा हळू चालव असे वारंवार सांगून देखील रिक्षाचालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पीड ब्रेकरवर ही रिक्षा पलटी झाली. रिक्षेत अडकलेल्या वयोवृध्द प्रवाशाला नागरिकांनी बाहेर काढताच रिक्षाचालक मात्र रिक्षा घेऊन फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, तसेच तो वारंवार सिगारेटही पीत होता असे प्रवाशाचे म्हणणे आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल झाला असून रिक्षाचालक अद्याप हाती लागलेला नाही. शहरात रिक्षाचालकांकडून लूटमार होणे, प्रवाशांसोबत गैरवर्तवणूक करणे असे प्रकार सर्रासपणे होत असून आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून मात्र अशा बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांवर कुठलीच कारवाई होतांना दिसून येत नाहीय.
पोलीस कारवाई कधी करणार?
एकीकडे नाशिक पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जात असताना दुसरीदके मात्र वेगात वाहने चालवून अपघाताचे प्रमाण वाढते आहे. शहरात स्पोर्ट बाईक वाल्यांना रोखणारे कुणी नसताना आता मद्यपी वाहनचालकांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी शहरातील एका प्राध्यापकाने पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. या प्राध्यापकाने तीन ते चार वाहनांना धडक देऊन रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना पळता भुई थोडी केली होती. त्यामुळे नाशिक पोलिसांनी निर्णयावर अंमलबजावणी करण्याची वेळ या सर्व घटनांवरून आल्याची दिसून येत आहे. अन्यथा सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झालेच म्हणून समजा.