Nashik News : नाशिकमध्ये दूषित पाण्यामुळे जुलाब व उलट्यांचा त्रास, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
Nashik News : इगतपुरीसह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इतरही तालुक्यांतील दूषित पाण्याचा प्रश्न पुढे आला आहे.
Nashik News : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावात दूषित पाण्याच्या (Contaminated water) वापरामुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्याची घटना समोर आली. इगतपुरी तालुक्यातील ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी देखील तारांगणपाडा येथील चाळीसहून अधीक जणांना दूषित पाण्यामुळे त्रास झाला होता. त्यानंतर फांगुळगव्हाण घटना समोर आल्याने इगतपुरीसह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इतरही तालुक्यांतील दूषित पाण्याचा प्रश्न पुढे आला आहे.
एकीकडे यंदा पावसाने (Rain) थैमान घातल्यानंतर नदी नाले, विहिरी तुडुंब भरल्या. त्यानंतर देखील परतीचा पाऊस झाल्याने अनेक भागात नदी नाले वाहू लागले. हेच पाणी पुन्हा नागरिकांच्या वापराच्या पाण्यात मिश्रित झाल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या समजते. कारण इगतपुरी प्रमाणेच जिल्ह्यातील त्रंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ, सुरगाणा (Surgana) आदी भागात दूषित पाण्यामुळे इतर आजारांची साथ वाढली असून अनेक गावांमध्ये रुग्णसंख्या मागील काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे तात्काळ संबधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व्यवस्थापनाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी देण्याची आवश्यकता आहे.
इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण येथील 25 जणांना दूषित पाण्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असल्याची घटना समोर आली आहे. इगतपुरी ग्रामीण रुग्णालय 17 तर काहींवर खाजगी तर काही रुग्णांवर घोटी येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाण गावात भेट देऊन नागरिकांना मदत करत प्रशासनाला कडक सुचना दिल्या. तसेच इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारीच हजर नसल्याने संतप्त झाले. एवढी मोठी घटना होऊनही आरोग्य विभाग करतय काय? असा सवाल उपस्थित केला. खोसकर यांनी दाखल रूग्णांची विचारपुस करून उपचारात हयगय करता कामा नये अशा सुचना उपस्थित डॉक्टरांना दिल्या.
अनेकदा ग्रामपंचायतीकडून वापरत्या विहिरीचे पाणी [पिण्यायोग्य करण्यासाठी पावडरचा वापर केला जातो. यामुळे पाणी स्वच्छ होत असून ते ग्रामस्थांना पिण्यायोग्य होते. मात्र फांगुळगव्हाण येथे पिण्याच्या पाण्यात पावडरचे प्रमाण जास्त झाल्यामुळेच उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासक, ग्रामसेवक यांचा भोंगळ कारभारामुळे गावातील ग्रामस्थांना मानसिक व शारीरिक तसेच आर्थिक हानी पोहचत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथेही ५० ते ६० नागरिकांना दुषित पाण्यामुळे त्रास होऊन एका रुग्णाचा मृत्यु झाला होता. दरम्यान याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा परिषदेने लक्ष घालावे अशी मागणी आमदार हिरामण खोसकर करणार आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रशासनाची गय केली जाणार नाही असा ईशारा खोसकर यांनी यावेळी दिला.
इगतपुरी तालुक्यातील दुसरी घटना
इगतपुरी फांगुळगव्हाण येथील 25 जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्यानंतर आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार न झाल्याने रुग्णांना खाजगी दवाखाने, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तत्पूर्वी 16 ऑक्टोबरला देखील इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 40 लोकांना दूषित पाण्यामुळे असा त्रास झाला होता. यात एकाचा मृत्यू देखील झाला होता. या घटनेला पंधरा दिवस होत नाही तोच ही दुसरी घटना घडल्याने पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दूषित पाण्यामुळे हा त्रास झाला असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम बी देशमुख यांनी दिली.