Nashik News : बळीराजा आपलाच! प्रत्येक शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार, पालकमंत्री दादा भुसेंची ग्वाही
Nashik News : बळीराजा आपलाच! प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळी गोड होणार, पालकमंत्री दादा भुसेंची ग्वाही
Nashik News : राज्यात परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला असून, शेतकरी (Farmers) मोठ्या अडचणीत सापडला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले असून दिवसभर उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्ह्यात अनेक भागात पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान मागील चार महिने धोधो पाऊस कोसळल्यानंतर आता परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विजांच्या कडकडाट, ढगांचा गडगडाटासह पाऊस होत असून या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, बागलाण आदी परिसरात मोठ्या प्रकारावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतीच्या नुकसानीचे जागेवर पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीतच दिले असून त्यानुसार पंचनामे सुरू आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसेही वर्ग केले जात असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, अवकाळी पावसाचा कहर राज्यभर सुरू आहे. शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत सविस्तर चर्चा करून तातडीने जागेवरच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अवकाळी, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पिकांची अक्षरशः धूळधाण झालीय. भात, टोमॅटो, इतर भाजीपाला, सोयाबीन या हाताला आलेली पीकं मातीमोल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना मदत मिळणार
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पंचनामे झाले असून अनेक भागात पंचनामे सुरु आहेत. अशातच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहचविण्याचे काम सुरु आहे. राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत साडेतीन ते चार हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. यापूर्वीचा एनडीआरएफच्या निकषानुसार 65 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तरच आर्थिक मदतीचा निकष विद्यमान सरकारने रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे. नाशिक जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही भुसे म्हणाले.