Nashik Long March : दोन दिवसात 66 किलोमीटरचं अंतर कापलं, पायाला फोड; लाल वादळ मुंबईच्या दिशेने
Nashik Long March : शेतकरी लॉन्ग मार्चने दोन दिवसांत 66 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं असून हा मोर्चा आता घोटी शहराजवळ आहे.
Nashik Long March : तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनावर (Vidhanbhavan) घुमणार असून नाशिकमधुन निघालेलं लाल वादळ दोन दिवसांत 66 किलोमीटरचं अंतर कापलं. लाल वादळाच्या लॉन्ग मार्चचा (Long March) आजचा तिसरा दिवस असून शेतकरी वर्गाचा हा लॉन्ग मार्च आतापर्यंत घोटी शहरापर्यंत (Ghoti) पोहचला आहे. मात्र या 66 किलोमीटरच्या अंतरात मोर्चेकऱ्यांचे पाय सुजायला सुरुवात झाली असून मात्र विधानभवनावर धडक देणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकार बदललं, मात्र आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडतो आहे, लढतो आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. इकडे लाल वादळाने एकत्र येत पुन्हा सरकारला घाम फोडण्यासाठी लॉन्ग मार्चचं आयोजन केले. त्यानुसार मागील 48 तासांपासून हजारो शेतकरी लॉन्ग मार्चच्या माध्यमातून पायी चालत आहेत. दिंडोरी (dindori) येथून निघालेला पायी लॉन्ग मार्च काल शहरातील जवळील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मुक्कामांनंतर नाशिक शहरातून पुढे निघाला. आता हा मोर्चा घोटी शहरानजीक असून आतापर्यंत या मोर्चाने जवळपास 66 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.
पायी लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून नाशिकनंतर (Nashik) घोटी परिसरात हा मोर्चा विसावणार असल्याचे समजते. मात्र या दोन दिवसांच्या प्रवासानंतर अनवाणी पाय सुजू लागले आहेत, बोलू लागले आहेत. मात्र प्रश्न सुटले पाहिजेत ही आस घेऊन शेतकरी कष्टकरी वर्ग पायी चालत आहे. आजपर्यंत सरकार कुणाचंही असले तरीही सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून भर उन्हात, रस्त्यावरील डांबर तुडवत हे लाल वादळ उन्हात राबणाऱ्या पायांमुळे विधानभवनावर झेपावत आहे.
आजची बैठक रद्द?
दरम्यान 2018 मध्ये अशाच पद्धतीने लॉन्ग मार्चच्या माध्यमातून सरकारच लक्ष वेधलं होत. त्यावेळी देखील अनेक मागण्या घेऊन लाल वादळ विधानभवनावर धडकले होते. मात्र पुन्हा एकदा जुन्याच मागण्या घेऊन लाल वादळ मुंबईला जात आहेत. या लॉन्ग मार्चमध्ये देखील असंख्य शेतकरी बांधव एकत्रित आले असून विधानभवनला धडक देऊन सरकारला घाम फोडणार असल्याचे चित्र आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार होती. मात्र काही कारणास्तव बैठक रद्द करण्यात आल्याचे समजते. एकीकडे राज्य कर्मचारी देखील संपावर असल्याने सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.