Nashik Crime : नाशिकमध्ये युवतीच्या स्कुटीच्या डिक्कीत आढळला गावठी कट्टा, अधिकाऱ्यांना ऐन थंडीत फुटला घाम
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) एका तरुणीच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) गुन्हेगारी फोफावत चालली असून यामध्ये घरफोडी, हाणामारी, शस्र वापरणे, परिसरात दशहत निर्माण करणे हे नित्याचे झाले आहे. यात अल्पवयीन तरुणांचा सहभाग अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच नाशिकमध्ये एका तरुणीच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा आढळून आल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या काठे गल्ली ही घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या तरुणीच्या घरी वसुली अधिकारी गेल्यानंतर तरुणीच्या गाडीच्या डिक्कीत कट्टा आढळून आल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाली. त्यांनी तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) घटनास्थळी धाव घेत युवतीला ताब्यात घेतले. या युवतीने गावठाण गावठी कट्टा कुठून आणला? कोणी दिला? तिचा उद्देश काय याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या घटनेने पोलीस प्रशासनांसह (Police Department) परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान संशयित युवती मानेकशहा नगर परिसरात असलेल्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. युवती हि खासगी जॉब करते. तिने बँक फायनान्स कडून कर्ज घेत गाडी खरेदी केली होती. कर्ज थकले असल्याने फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी काटे गल्ली येथील तरुणीच्या फ्लॅटमध्ये आले होते थकीत कर्ज भरा अथवा गाडी जमा करा असे या प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी युवतीच्या गाडीच्या डिक्कीत गावठी कट्टा आढळून आला. न घाबरता फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी 112 या पोलीस हेल्पलाईनला घटनेची माहिती दिली. काही वेळाने भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. संबंधित संशयित युवतीला ताब्यात घेतले. या तरुणीची दुचाकी आणि गावठी कट्टा जप्त केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
साफसफाई दरम्यान सापडला...
दरम्यान भद्रकाली पोलिसांनी संशयित युवतीला ताब्यात घेतले असून तिच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याबाबत रहिवाशांना या युवतीबद्दल फारशी माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मात्र युवतीला भेटण्यास काही इसम येत असल्याची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. संशयित तरुणीला पोलिसांनी या कट्ट्याबाबत विचारणा केली असती तिने घरात साफसफाई करताना बंदूक मिळून आल्याचे सांगितले. मात्र या बंदुकीचा परवाना तिच्याकडे नसल्याचे तरुणी खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने संबंधित तरुणीची कसून चौकशी सुरू आहे.