(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माथेरानमध्ये लवकरच ई रिक्षा धावणार, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
माथेरान या पर्यटनस्थळी ई-रिक्षा सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला आहे.
माथेरान : राज्यातल्या माथेरान या पर्यटनस्थळी ई-रिक्षा सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला आहे. तसंच पुढील तीन महिन्यांत ई-रिक्षाची ट्रायल घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. निसर्गरम्य माथेरानमध्ये जगभरातून पर्यटक येतात. पण पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना ये जा करण्यासाठी पायपीट, हातरिक्षा आणि घोडे याशिवाय पर्याय नाही. या अमानवी वाहतुकीविरोधात पर्यावरण मित्र सुनील शिंदे यांनी दहा वर्षे न्यायालयीन लढा दिला. त्यांच्या या लढ्याला अखेर यश आलं असून, सर्वोच्च न्यायालयानं ई-रिक्षाला हिरवा कंदील दाखवला आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं माथेरानकरांनी स्वागत केलं आहे.
माथेरान येथील जंगल आणि पर्यावरणाला कार्बन डाय-ऑक्साइडमुळे बाधा येऊ नये. तसेच येथील नैसर्गिक सौंदर्य संपुष्टात येऊ नये याकरिता ब्रिटिश काळापासून येथे डिझेल पेट्रोलच्या वाहनांना बंदी आहे. पर्यायाने येथे पर्यटकांना गेली 100 वर्षांपासून फिरण्यासाठी माणसाने ओढणाऱ्या गाड्या अस्तित्वात होत्या. या अमानुष अमानवी वाहतुकीविरोधात पर्यावरण मित्र सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात येथे ई रिक्षाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या एक दशकाच्या संविधानिक लढ्याला अखेर यश आलंय.
सर्वोच्च न्यायालयाने 12 मे रोजी माथेररांकरांनी अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे, आम्ही लवकरच प्रशासकीय कारवाई पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करून ई- रिक्षाचा ट्रायलसाठी प्रयत्न करू अशी माहिती माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिले आहे.
माथेरानला फिरण्यासाठी आलेल्या अपंग, रुग्ण, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना आता घोड्यावर जाणे अथवा पायपीट करण्यापासून आता सुटका होणार आहे. तसेच हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून याचा फायदा पर्यटकांना नक्की होणार आहे अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे. तसेच व्यापाऱ्यांना देखील आपला मालवाहतुकीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता तो आता टळणार असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये ही आनंदाचे वातावरण आहे.
अनेक वर्षांपासून येथे पर्यटकांना ने आण व पर्यटन करवणारे घोडेवाले यांना मात्र या ई - रिक्षा डोकेदुखी ठरू शकतो, घोडेवाले नाराज होऊ शकतात म्हणून माथेरान पोलीस ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ब्रिटिश काळापासून माणूसच माणसाला ओढतोय या अमानवीय प्रथेला बंद करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ई रिक्षाचा ट्रायल घेण्यासाठी आदेश दिला आहे, दरम्यान ई रिक्षा चा ट्रायलला यशस्वी करून पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना लवकरच दिलासा मिळावा हीच अपेक्षा.