'एक तास वाट बघायला लावली', नाना पाटेकर तिरमिरीत निघून गेले; ओ रोमिओच्या ट्रेलर लॉन्चवेळी नेमकं काय घडलं? विशाल भारद्वाज यांनी सगळं सांगितलं!
ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला सगळे कलाकार उपस्थित होते, मात्र कार्यक्रमाच्या मध्यातच नाना पाटेकर अचानक निघून गेल्याने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.

O Romio trailer launch Nana Patekar:चित्रपट ‘ओ रोमियो’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी, फरीदा जलाल यांसारख्या कलाकारांची स्टारकास्ट असल्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिक आहे. ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला सगळे कलाकार उपस्थित होते, मात्र कार्यक्रमाच्या मध्यातच नाना पाटेकर अचानक निघून गेल्याने सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.
View this post on Instagram
ट्रेलर लॉन्चमध्ये काय घडलं?
पोस्टर लॉन्चचाच कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने सगळं वेळापत्रक ढासळलं. पोस्टरचं अनावरण होत असतानाच दुपारचा 1 वाजला, त्यामुळे पुढील कार्यक्रमालाही उशीर झाला. याच दरम्यान शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि काही इतर कलाकार ट्रेलर लॉन्चसाठी एक ते दीड तास उशिराने पोहोचले.
इतका वेळ वाट पाहून नाना पाटेकर वैतागले. अखेर त्यांनी कोणतीही घोषणा न करता ट्रेलर लॉन्च सुरू होण्याआधीच कार्यक्रमस्थळ सोडलं.
ट्रेलर लॉन्चदरम्यान दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी स्वतः नाना पाटेकर यांच्या जाण्याबद्दल खुलासा केला. विशाल म्हणाले की, नाना कार्यक्रमातून निघून गेले असले, तरी त्यांच्याबद्दल काही शब्द बोलणं गरजेचं आहे.
“नानांच्या स्वभावात अजूनही शाळेतला तो खोडकर, थोडा दादागिरी करणारा मुलगा आहे.जो सगळ्यांना घाबरवतोही आणि सगळ्यात जास्त मनोरंजनही करतो. आणि म्हणूनच सगळ्यांना त्याच्यासोबत राहावंसं वाटतं,” असं विशाल भारद्वाज म्हणाले.
‘हेच त्यांना नाना पाटेकर बनवतं’
विशाल यांनी पुढे सांगितलं, “माझी आणि नानांची मैत्री तब्बल 27 वर्षांची आहे. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. ते इथे असते, तर नक्कीच आनंद झाला असता. पण त्यांनी त्यांच्या खास स्टाइलमध्ये सांगितलं‘मला एक तास थांबवलं, आता मी निघतो.’ आम्हाला याचं काहीही वाईट वाटलं नाही, कारण हाच स्वभाव त्यांना नाना पाटेकर बनवतो.”
‘ओ रोमियो’ कधी होणार प्रदर्शित?
‘ओ रोमियो’ हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर ‘हुसैन उस्तरा’ या भूमिकेत दिसणार असून, तृप्ती डिमरीसोबत त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये दोघांमधील तीव्र रोमँस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं आहे. यात नाना पाटेकरही एका महत्त्वाच्या आणि दमदार भूमिकेत दिसणार आहेत. तसेच दिशा पाटनी एका खास डान्स नंबरमध्ये झळकणार आहे. याशिवाय विक्रांत मॅसी, तमन्ना भाटिया, फरीदा जलाल यांच्याही भूमिका आहेत. एकूणच, दमदार स्टारकास्ट, शाहिद कपूरचा अॅक्शन अवतार आणि प्रभावी ट्रेलरमुळे ‘ओ रोमियो’बाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.























