(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस उतरणार रस्त्यावर; 31 ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन
NCP: टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 31 ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन करणार
NCP Protest: वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता टाटा एअर बस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुद्धा आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 31 ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत माहिती देतांना मेहबूब शेख म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात 'उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला' हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरला रोजी राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येईल. तसेच या आंदोलनात सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील व सर्व प्रदेश पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवतील, असेही शेख म्हणाले.
असा असणार आंदोलन...
पुढे बोलतांना मेहबूब शेख म्हणाले की, या आंदोलनांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फोटो असणारी कागदी विमाने हवेत उडून निषेध करण्यात येईल. तसेच गाजरे हातात घेऊन शिंदे-फडणीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येईल. विशेष म्हणजे राज्यभरात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनातील घोषणाबाजी
- महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादर!
- महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध!
- गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी.
- द्या आमच्या रोजगाराची हमी, बंद करा गुजरातची गुलामी.
- फडवणीस खातात महाराष्ट्राची भाकरी, करतात गुजरातची गुलामी.
- शिंदे फडवणीस यांच्या फेकू गप्पा, महाराष्ट्रद्रोही भाजपा...महाराष्ट्र द्रोही भाजपा.
- गद्दारांना 50 खोके, महाराष्ट्राला धोके.
शिंदे फडणवीस सरकारकडून गुजरातची चाकरी
याबाबत ट्वीट करत मेहबूब शेख म्हणाले की, आधी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेला गुजरातला, आता एअरबस-टाटा मिलिटरी एअरक्राफ्ट 22 हजार कोटींचा लष्करी ट्रान्सपोर्टचा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. आधीचा 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा हा 22 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकार गुजरातला देऊन, अतिशय चांगल्या प्रकारे गुजरातची चाकरी करताना दिसत आहे. अजून किती प्रकल्प जाणार गुजरातला, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला.