(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकास आघाडीचा आता सोमय्यांना इशारा; कोकणात येऊन तर दाखवा!
दापोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे दापोली, मंडणगडमधील नेते संजय कदम यांनी सोमय्यांनी येऊन दाखवावे असा इशारा दिला आहे.
रत्नागिरी : कोकणातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. कधी नारायण राणे, नितेश राणे तर कधी रामदास कदम आणि योगेश कदम यांना बाजुला करणं आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारण यामुळे कोकणातील राजकारण तापलं. यामध्ये कमी म्हणून की काय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवरून देखील राजकारण ढवळून निघालं. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, त्यावरून आता राजकीय वाद टोकाला गेले आहे. यावेळी निमित्त ठरला आहे तो किरिट सोमय्यांचा 26 मार्च रोजी होणारा दौरा आणि महाविकास आघाडीचा इशारा. दापोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे दापोली, मंडणगडमधील नेते संजय कदम यांनी सोमय्यांनी येऊन दाखवावे असा इशारा दिला आहे. आम्ही त्यांना रोखणार असं म्हटल्यानं या दौऱ्यावेळी मोठ्या वादाची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. संजय कदम यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.
काय म्हणाले संजय कदम?
'सोमय्यांनी दापोलीला येऊन दाखवावं आम्ही त्यांना रोखणार'. हे गुजरात नाही तर कोकण आहे. आम्ही कोकणातील लोक, पर्यटकांच्या साथीनं त्यांना रोखणार. यांच्या राजकारणाचा मोठा फटका आमच्याकडील पर्यटनाला बसत आहे. स्थानिकांनी कर्ज काढत, कोरोनातून सावरत आपला घसरलेला गाडा रूळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे राजकारण होणार असेल आणि त्याचा फटका इथल्या व्यवसायाला बसत, पर्यटनाला त्याचा फटका बसणार असल्यास आम्ही त्यांना रोखणार असल्याचं कदमांनी म्हटलं आहे.
वैभव खेडेकरांचा सदरा चर्चेत!
केवळ संजय कदमच नाही तर मनसेचे खेडमधील नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा सदरा देखील चर्चेत आला आहे. रंगपंचमीच्या वेळी खेडेकर यांनी व्हेरी गुड, सोमय्या आला का? असे शब्द असलेला सदरा परिधान केला होता. या सदऱ्याची देखील यावेळी चर्चा झाली होती. त्यामुळे वैभव खेडेकर यांच्या या सदऱ्यावरील शब्दांचा अर्थ नेमका काय? अशी चर्चा देखील रंगली आहे. त्यामध्ये आता संजय कदम यांच्या इशाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे सोमय्यांच्या दौऱ्यावेळी नेमकं काय होणार? याबाबत आता विविध तर्क कोकणातील राजकारणात चर्चिले जात आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha