Maharashtra News Updates: जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल..

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Feb 2023 11:59 PM
जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल..

नौपाडा पोलिसांनी ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३०७, ३३२, ५०६(२), १४३, १४८, १४९, १२० (ब), सह शस्त्रास्त्रे प्रमाणे नोंद केली आहे. नगरपालिका. अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदविण्यात आला आहे.


बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत.

NCP Jitendra Awhad: ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, महेश आहेर यांना मारहाण केल्याचा संशय

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कार्यकर्त्यांवर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याचा पोलिसांना संशय आहे.


 

अमरावती शहरात हेल्मेट आणि सीट बेल्ट अनिवार्य, नियम मोडल्यास होणार कारवाई  

आजपासून अमरावती शहरात हेल्मेट, सीट बेल्ट पोलिसांनी अनिवार्य केलं आहे. मागील वर्षी अमरावती शहरात 91 अपघात झाले, ज्यामध्ये 101 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 106 गंभीर अपघात झाले ज्यामध्ये 151 जण जखमी ज्यात 93 जणांना गंभीर दुखापत झाली होती. त्याच प्रमाणे 201 अपघात हे किरकोळ झाले ज्यात 247 जण जखमी झाले. त्यामुळेच अमरावतीचे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट अनिवार्य केले आहेत. सर्व दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालकांसाठी सीटबेल्ट अनिवार्य करण्यात येत आहे. नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध आगामी काळात प्रभावी कार्यवाही करणार असे आदेशात देण्यात आले आहेत.  

बार्शीतील फटाका फॅक्टरी ब्लास्ट प्रकरणात दोषींवर कारवाई करा; लहुजी शक्ती सेनेची मागणी  

बार्शीतील पांगरी फटाका फॅक्टरी ब्लास्ट प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करत मागणी  केली आहे.  बार्शी तालुक्यातील शिराळा - पांगरी गावाजवळ असलेल्या फटाका फॅक्टरी मध्ये काही दिवसांपूर्वी ब्लास्ट झाला होता. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने केलेल्या तपासणीत ही फटका फॅक्टरी अवैधरित्या सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर देखील दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मागील चार ते पाच वर्षांपासून ही फॅक्टरी सुरू होती. तेव्हा ह सगळा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला नाही का असा सवाल उपस्थित करत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आणि मुंडन आंदोलन करण्यात आले. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली.

22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करणार; राजू शेट्टींचा इशारा

मुंबई : येत्या 22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर  50 हजार रुपये तातडीने अनुदान द्यावे. वीजबील दुरुस्त करून घ्या आम्ही भरतो, मीटर बंद असले तरी बीलं मोठ्या प्रमाणात आली आहेत. 37 टक्क्यांची वीजदरवाढ आम्हला परवडणारी नसून ती मान्य नाही. शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी, सरकारने दिलेलं आश्वासन पाळावे, या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.  

बीड - मोटरसायकल पेटवून दिल्याने पोलिसात तक्रार

माजलगाव शहरातल्या शिवाजीनगर भागामध्ये अज्ञात व्यक्तींने  घरासमोर उभी असलेली मोटरसायकल पेटवून दिल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.. शिवाजीनगर भागामध्ये राहणारे शाहीद पठाण यांनी अकरा वाजता आपल्या घरासमोर मोटरसायकल उभी केली होती मात्र मध्यरात्री अचानक करण्यात व्यक्तींना ही मोटरसायकल पेटवून दिली आहे यामध्ये मोटरसायकलच पूर्णपणे नुकसान झाला असून शाहेद पठाण यांच्या तक्रारीवरून माजलगावच्या शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

तुर्भे एमआयडीसीतील कपडा कंपनीतला भीषण आग. आगीत मोठे नुकसान

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील एका कपडे कारखान्याला भीषण आग लागली होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी आगीत कंपणीचे मोठे नुकसान झाले आहे. कपडा कंपनी असल्याने काही क्षणात पूर्ण कंपनीत आग पसरली असून पूर्ण परीसात धूर झाला आहे. आकाशात उडणारे धुराचे लोट हे सुमारे तीन ते चार किलोमीटर दूर असलेल्या सायन पनवेल महामार्गावरून दिसत होते.


आग विझवण्यासाठी वाशी, नेरूळ , सीबीडी, तसेच एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणेच्या १० ते १२ गाड्या घटणास्थळी आल्या होत्या. पुजा गारमेन्टस कंपणीला ही आग लागली होती. अग्निशमन विभागाने त्वरीत आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारील कंपणीत ती पसरू शकली नाही. दरम्यान या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.

गाडीसमोर अचानक आला बिबट्या प्रवाश्यांमध्ये घबराट..

कसारा - रात्रीच्या सुमारास वाशाळा रोडवर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. कसारा-वाशाळा भागात भर रस्त्यात बिबट्या चारचाकी गाडीसमोर आल्याचे पाहावयास मिळाले आहे. गाडीसमोरून शांतपणे चालत बिबट्या अभयारण्याकडील बाजूस गेल्याचे प्रत्यक्षदर्शी बाळा भोसले  यांनी सांगितले आहे. या बिबट्याचा व्हिडिओ अगदी वेगाने वायरल होत असून त्या मार्गाने येजा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाला या बाबत माहिती मिळताच वनविभागाची टीम त्या बिबट्याच्या शोध करत आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारीकरण मुक्त करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारीकरण मुक्त करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. 2014 साली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर राज्य सरकारने ताब्यात घेतले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारीकरण मुक्त होणार असा डॉ सुब्रमण्यम स्वामींचा विश्वास.

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा झाली आहे. सरकारी कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पोलिसांनी संशयास्पद गाडी पकडली होती. त्यावेळी गाडी सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी बडगुजर यांच्यासह तिघांना शिक्षा सुनावली आहे.  

मालवाहतूक करणार्‍या ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, बीडमधील घटना 

बीडच्या काडा येथे पैठण बारामती रोडवर भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात  दोघांचा मृत्यू झालाय. बाबासाहेब गर्जे आणि नारायण गोल्हार अशी मृत्यू झालेल्या दोन्ही शेतकऱ्यांची नावे आहेत. आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत  कांद्याचा लिलाव असल्याने या लिलावासाठी खिळद येथील हे शेतकरी आले होते. यावेळी आपलं काम संपवून हे शेतकरी बाजार समितीच्या बाहेर येत असताना मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. 

Gondiya News: गोंदियत जावयाने सासऱ्यासह पत्नी मुलाला पेट्रोल टाकून जाळले, सासऱ्याचा मृत्यू

Gondiya News: गोंदियाच्या सुर्याटोला येथे जावयाने सासरा आणि आपल्या पत्नीसह मुलांना पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय. कौटुंबिक वादातून हा सगळा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. याघटनेत सासऱ्याचा मृत्यू झालाय, तर पत्नि आणि मुलांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय. या घटनेनंतर आरोपी फरार झालाय. पोलीस या आरोपीचा शोध घेतायत.  

Rohit Pawar: गुजरातच्या निवडणुकीवेळी उद्योग पळवले आता देवही पळवू लागले : रोहित पवार

Rohit Pawar: सहावं ज्योतिर्लिंग हे भीमाशंकर नसून ते आसामला असल्याचा दावा करणं आश्चर्यकारक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केलंय. गुजरातच्या निवडणुकीवेळी उद्योग पळवले आता देवही पळवू लागले आहे. त्याचप्रमाणे, सत्तेसाठी जे आसामला गेले होते, त्यांनी यावर बोललं पाहिजे अशी टीकाही रोहित पवार यांनी केलीय.

Maharashtra Political Crisis: पक्षांतरबंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही : हरीश साळवे

Maharashtra Political Crisis:  पक्षांतरबंदी कायद्यामुळे देशात पक्षांतर थांबलेलं नाही, कायदा पक्षांतर बंदीचा आहे, मतभेदांसाठी नाही, असं हरीश साळवे म्हणाले.

Maharashtra Kolhapur News : कोल्हापुरात पाच मार्चला 'रन फॉर हेल्थ, रन फॉर मिलेट'चे आयोजन; आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी उपक्रम

पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व घराघरांत पोहोचवणे गरजेचे आहे. 5 मार्च रोजी रन फॉर हेल्थ रन फॉर मिलेट (पौष्टिक तृणधान्य जनजागृती दौड) आयोजित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या. अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर

Jalna News: मुलानं स्वतःच्याच मित्राचा खून केल्याचं कळताच वडिलांनी सोडला जीव; जालन्यातील धक्कादायक घटना

मुलाने खून केल्याची माहिती मिळताच, अकबर शेख यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू  झाला आहे. अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर...

Mumbai News : वरळीत इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून मोठा दगड कोसळून अपघात, दोन जणांचा मृत्यू

Mumbai News : बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या (Building)  42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आज दुसरा दिवस, आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार

Maharashtra Political Crisis:  राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सात न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्णय देणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. मंगळवारी या संबंधित ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला. आज शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येणार असून आज यावर निर्णय होऊ शकतो. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही?, याबाबत सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाने मागणी केलीय. दरम्यान, या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस राखीव ठेवले आहेत. आज जर या प्रकरणाचा निर्णय झाला नाही तरी उद्या तो होईल असं सांगण्यात येतंय.

आज पुन्हा सत्तासंघर्षावर सुनावणी; काल 4 तासांहून अधिक काळ ठाकरे गटाचा युक्तिवाद आज शिंदे गटाचे वकील हरीश साळवे युक्तिवाद करणार

Maharashtra Political Crisis: राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सात न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्णय देणार की पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. मंगळवारी या संबंधित ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला. आज शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात येणार असून आज यावर निर्णय होऊ शकतो. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव मांडला असताना त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे की नाही?, याबाबत सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी व्हावी अशी ठाकरे गटाने मागणी केलीय. दरम्यान, या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस राखीव ठेवले आहेत. आज जर या प्रकरणाचा निर्णय झाला नाही तरी उद्या तो होईल असं सांगण्यात येतंय.

Maharashtra News: चाकण एमआयडीसी हद्दीत खंडणी मागणाऱ्या चौदा माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल

Maharashtra News: चाकण एमआयडीसी हद्दीत खंडणी मागणाऱ्या चौदा माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल झालाय. अनलोडिंग करणाऱ्या वाहन चालकांकडून हे कामगार खंडणी मागत होते. उत्तराखंड, कर्नाटक, बेंगलोर तसेच राज्यातून इथं शेकडो वाहनं भरून कच्चा माल येतो. तो खाली उतरविण्याचा मोबदला म्हणून माथाडी कामगार त्या वाहनांपैकी काही चालकांकडे खंडणी मागायचे. ऑक्टोबर 2021 पासून आत्तापर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर म्हाळुंगे पोलिसांत चौदा माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

बारामती तालुक्यातील शेती कामासाठी जाणाऱ्या महिलांचा जिवाशी खेळ

Pune : बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी येथील शेती कामासाठी जाणाऱ्या महिला विनाकारण जिवाशी खेळत आहेत. नीरा डाव्या कालव्याचे पुलाचे काम सुरू असून सध्या हा पूल वाहतुकीसाठी व येण्या जाण्यासाठी बंद आहे परंतु शेंडकरवाडी येथील महिलांना हा पूल पास करून सोरटेवाडी परिसरात शेतीकामासाठी जावे लागते. रस्त्याने जायचे झाल्यास हा मार्ग लांब पडतो. म्हणून या महिला याच पुलावरून जीवघेणी कसरत करत आहेत. नीरा डाव्या कालव्यावरील पुलाचे संथ गतीने काम सुरू असून लवकरात लवकर हा पूल वाहतुकीसाठी व येणे जाण्यासाठी सुरू करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

Pune News:  शिक्षक अधिवेशनासाठी पुणे जिल्ह्यातून 10 हजार शिक्षक जाणार

Pune News:  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी संपन्न होत आहे. पुणे जिल्ह्यातून या अधिवेशनासाठी 10 हजार हून अधिक सभासदांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर करण्याचे परिपत्रक जारी केले आहे.  बहुसंख्य शाळेतील शिक्षक हे अधिवेशनाला जाणार असल्याने उरलेल्या शिक्षकांवर शाळा सुरू ठेवण्याची जबाबदरी असणार आहे.  पुणे जिल्ह्यातून कुठल्या शाळेतील किती शिक्षक अधिवेशनात सहभागी झाले आहेत याची माहिती अद्याप समजू शकली नाही. 


 

 
Nashik News: नाशिककरांचा प्रवास आजपासून महागला, सिटीलिंक बससेवेत दरवाढ

Nashik News: नाशिककरांचा प्रवास आजपासून महागला आहे. नाशिक महानगरपालिकाची सिटीलिंक बस सेवेची दरवाढ झाली असून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. ST महामंडळने तोट्यात जाणारी शहर वाहतूक बससेवा चालविण्यास असमर्थता दाखविल्या नंतर नाशिक महानगरपालिकाने परिहवन महामंडळची स्थपना केली.  जुलै 2021 मध्ये बससेवा सुरू केली. मात्र सुरुवातीपासुनच बससेवा  तोट्यात आहे. त्यातच इंधन दरवाढ झाल्यानं प्रवासी भाडे दरवाढ प्रस्तावित होते, शहर आणि 20 ते 25 किलोमीटर पर्यंत ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या बसची सरासरी 7 टक्के भाडेवाढ करण्यात आली असून 2 ते 10 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत, विद्यार्थ्यांच्या मासिक पासची किंमत ही वाढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहिते मुळे मागील महिन्यातच होणारी दरवाढ आता होत आहे. कायमच कुठल्यानं कुठल्या कारणानं चर्चेत राहणारी बससेवा आता आर्थिक भुर्दंड देणारी ठरली आहे.

Satara News: साताऱ्यात सातवीतील मुलगी चार महिन्याची गरोदर, नववीतल्या शाळकरी मुलावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Satara News: साताऱ्यात एक  धक्कादायक घटना घडली आहे.  सातवीतील मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  नववीतल्या शाळकरी मुलावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीत आणखी एक घोटाळा

Bhandara News:  पणन महासंघाचं निर्देश असतानाही त्याची योग्य अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात न करताच शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात तब्बल 301 धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून सुमारे 276 धान खरेदी केंद्रांपैकी केवळ 55 धान खरेदी केंद्रांवरच सीसीटिव्ही कॅमेरे लावून धान खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अपहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Solapur Fire: सोलापूरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील रबर फॅक्टरीला भीषण आग

Solapur Fire: सोलापूरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे एका रबर फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. भीषण आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.  आगीमध्ये संपूर्ण माल जळून खाक झाला आहे मात्र जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.गुजरात रबर फॅक्टरी असे या आग लागलेल्या फॅक्टरीचे नाव असून आसपासच्या दोन ते तीन फॅक्ट्रीरीही जळून खाक झाल्या आहेत. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाच्या 50 हुन अधिक गाड्या घटनास्थळी दाखल

संत सेवालाल महाराज यांची आज 284 वी जयंती, वाशिमच्या पोहरादेवीत बंजारा भाविकांची मांदियाळी. कबीरदास महाराजांचा आज राजतिलक सोहळा

Washim News:  संत सेवालाल महाराज यांची आज 284 वी जयंती आहे. वाशिमच्या पोहरादेवीत बंजारा भाविकांची मांदियाळी. कबीरदास महाराजांचा आज राजतिलक सोहळा होणार आहे.   आज पासून मुख्य बंजारा धर्मगुरू म्हणून कबिरदास महाराज  असणार आहेत .आजच्या तिलक समारोह निमित्त मोठ्या संख्येने बंजारा भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यानंतर ही सर्वात मोठी घोषणा झाली 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या चार तासापेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याशिवाय  प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होमग्राऊंडवर आज दोन सभा होणार आहेत. 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या चार तासापेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी यांनी चार तासांपेक्षा जास्त युक्तिवाद केला. कोर्टाची वेळी 4 वाजता संपल्यामुळं सुनावणी दुसऱ्या दिवशीवर ढकलली गेली होती. आज शिंदे गटाचे वकील हरिष साळवे युक्तिवाद करतील. 


प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची मुंबईतील टिळक भवनमध्ये बैठक


 प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार व भारत यात्रींचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.  राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत. 


ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होमग्राऊंडवर आज दोन सभा होणार आहेत. पहिली सभा कल्याणमध्ये तर दुसरी सभा उल्हासनगरमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचा कल्याणमध्ये कार्यक्रम होईल. 


राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक


आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षातील सर्व आमदारांची बैठक आज सकाळी 10 वाजता विधान भवनात होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित असतील. आगामी अर्थ संकल्पात विरोधकांना धारेवर धरण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक असेल. 10 दिवसांपूर्वी अशीच एक बैठक पार पडली होती त्यामध्ये महागाई, भ्रष्टाचार यासोबतच अदानी समुहामुळे झालेली वाताहत यावर सरकारला धारेवर धरण्याच निश्चित करण्यात आलं होतं.  


पुरंदर तालुक्यातील वीर येथील मस्कोबाच्या यात्रेची सांगता 


पुरंदर तालुक्यातील वीर येथील मस्कोबाच्या यात्रेची सांगता होणार आहे. मारामारीने म्हणजेच रंगाची शिंपण करून या यात्रेची सांगता होते. ही रंगांची शिंपण बघण्यासाठी राज्यभरातून लोक दाखल होत असतात. दुपारी 12 वाजता या रंगाची शिंपण करून यात्रेची सांगता होणार आहे... देवावर रंगाची शिंपण केली जाते, यानंतर तो रंग भाविकांवर सिंपडला जातो. तो रंग अंगावर घेण्यासाठी जी गडबड गोंधळ होतो त्यालाच मारामारी म्हणतात.


पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुनावणी


 पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्ती दिनेश शर्मा यांच्यापुढे  सुनावणी चालणार आहे. राज्य सरकारनं एखाद्या संस्थेवर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना नियमानुसार आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. तर राज्य सरकारही बंदी का आवश्यक यावर बाजू मांडणार. 


आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.