Maharashtra News Updates 28 September 2022 : लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 वितरण समारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी 6 वाजता पु.ल.देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हायकोर्टानं यावर तातडीनं सुनावणी सुरू केली आहे. मंगळवारच्या सुनावणीत देशमुखांच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. आज ईडीच्यावतीनं एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानं हायकोर्ट यावर लवकर निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर
खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत. लाखेवाडी येथे भोंडल्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी निमगाव या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेला सुरूवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून (28 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 वितरण समारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 वितरण समारंभ कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित आहेत.
Vasai Fire : वसईत एका कंपनीला भीषण आग, तीन ते चार कामगार अडकल्याची भीती
वसईत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीच्या धुराचे कल्लोळ आजूबाजूच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरातून दिसत आहेत. कंपनीत स्फोट होऊन आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात असून यात 3 ते 4 कामगार अडकल्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग जवळ वसई जूचंद्र वाकीपाडा परिसरातील कंपनीत आज दुपारी अडीच वाजताची घटना आहे. वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे गाड्या घटनास्थळावर पोहचण्यासाठी निघाल्या असल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी दिली आहे
Aurangabad: भगर विषबाधा प्रकरणी पोलिसांची कारवाई
Aurangabad: नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. तर आता याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबादच्या वैजापूर पोलिसांनी 8 किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली आहे.
यवतमाळमध्ये मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, 25 किरकोळ जखमी
PFI Ban : पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
PFI Ban : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.
पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पीएफआय वरील बंदीचे पुन्हा एकदा स्वागत केले आहे.