Maharashtra News Updates 22 January 2023 : कुर्ल्यातील शिवाजी मंडईतील दुकानांना भीषण आग, फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jan 2023 11:05 PM
Kurla Fire: कुर्ल्यातील शिवाजी मंडईतील दुकानांना भीषण आग, फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी

कुर्ल्यातील शिवाजी मंडई येथे दुकांनाना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या पोहोचल्या असून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

Jitendra Awhad and Amol Mitkari : 3 फेब्रुवारीपासून जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांची महापुरुष सन्मान यात्रा

Jitendra Awhad and Amol Mitkari : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांची महापुरुष सन्मान जागर यात्रा 3 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे.  जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्या साथीला आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची देखील साथ मिळणार आहे. हे तीन नेते मिळून राज्यभरात ठिकठिकाणी मेळावे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या गाथा सांगणार आहेत. 

Pune News : पुण्यात सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात

Pune News : पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यसह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा लाल महालपासून निघणार असून डेक्कनच्या छत्रपती सभाजी पुतळ्यापर्यत काढला जाणार आहे. या मोर्चाला हिंदू जनआक्रोश मोर्चा अस नाव देण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, 'तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई सह मोठा जनसमुदाय उपस्थितीत राहणार आहे. हा मोर्चा शहरातील मध्य भागातून म्हणजे शिवाजी रस्ता,लक्ष्मी रस्ता,अलका चौक डेक्कन चौक व शेवट छत्रपती सभाजी महाराज पुतळा असा जात असल्याने वाहतुक पोलिसांनी मोर्चा मुळे वाहतुकीत बदल केले आहेत.

Amravati Accident : अमरावतीत समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी

Amravati Accident : वेगवान महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून यावर अपघातांची मालिका सुरू आहे. आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील हद्दीत कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 3 जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात गाडी डीवाईडरला धडकल्याने झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Moreshwar Temurde passes away : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Adv. Moreshwar Temurde passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. अॅड टेमुर्डे यांनी 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात दोन वेळा वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलं. 1991 ते 1995 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते. टेमुर्डे, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले 1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव वरोरा येथील राहत्या घरी ठेवण्यात आले आहे.

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी
Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अबू आझमी यांच्या पीएला फोन करुन धमकी दिली आहे.
Amravati News : अमरावतीच्या दर्यापुरातील मोमीनपुरा भागातून मोठा शस्त्रसाठा जप्त, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Amravati News : अमरावतीच्या दर्यापुरातील मोमीनपुरा भागातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.  याप्रकरणी एकाच कुटुंबातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना अटक करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी 9 तलवार, 3 फरशा, 1 गुप्ती आणि शस्त्र बनवण्याचं साहित्य जप्त केलं आहे. दर्यापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जुन्या दर्यापूर शहरात असलेल्या मोमीन पुरा या भागातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहेत.

Satara Weather : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर गारठले, महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Satara Weather : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर. महाबळेश्वरमध्ये गेल्या आठ दिवसापासून तापमान खालावलेले पाहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी सलग पाच दिवस या भागातील दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळाले. काल रात्री या परिसरात तापमान घसरले असताना आता सकाळी वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरातील तापमान 9 अंश सेल्सिअस इतके झाले आहे.

Nanded News : नांदेड जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या आमदार खासदारांच्या आजपासून बैठका, नागरिकांशी करणार चर्चा

Nanded News : राष्ट्रीय राजकारणात आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समितीनं (TRS) आपल्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती ( BRS) असे केले आहे. दरम्यान BRS पक्ष राष्ट्रीय राजकारणातील आपली सुरूवात महाराष्ट्रातून करणार हे निश्चित झालं आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारत राष्ट्र समिती पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर ,बिलोली, धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षांच्या आमदार, खासदारांच्या बैठका होणार आहेत. तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या या संस्थेतील समन्वयकांसोबत आज सकाळी 10 वाजता  BRS पार्टीचे आमदार, खासदार बैठक घेणार घेऊन चर्चा करणार आहेत. येत्या निवडणुका आणि त्याची तयारी यासह विविध विषयावर सीमावर्ती भागातील विविध विषयांवर आज नागरिकांशी चर्चा होणार आहे.


 

Pralay On LAC : चीनसोबत तणाव सुरु असताना भारतीय वायुसेनेचं 'प्रलय'; राफेल-सुखोईची दिसणार ताकद, S-400 ही तैनात

Pralay Exercise On LAC : भारत (India) आणि चीन (China) यांच्यात सीमेवर तणाव (India China Border Dispute) कायम आहे. हा तणाव सुरू असतानाच भारतीय हवाई दल (Indian Air Force) युद्धसराव करणार आहे. हवाई दलाकडून (IAF) ईशान्य भागात एक मोठा युद्धाभ्यास (Indian Air Force Exercise) करण्यात येणार आहे. या युद्ध सरावाला 'प्रलय' (Pralay) असे नाव देण्यात आले आहे. हवाई दलाशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, सर्व प्रमुख एअरबेसमधून युद्धसराव केला जाईल. नुकतंच तैनात करण्यात आलेले S-400 स्क्वाड्रन हे लढाऊ विमानदेखील या युद्धसरावाचा एक भाग असेल.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Buldana News : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांचं प्रबोधन करण्यासाठी पथकाची स्थापना, बुलढाण्यात परिवहन विभागाकडून उपक्रम

Buldana News : समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांचं प्रमाण बघता आता परिवहन विभाग व एम.एस.आर.डी. सी. सक्रिय झाली असून बुलढाण्यात परिवहन विभागाकडून एक स्वतंत्र पथक स्थापण्यात आलं आहे. हे पथक समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांचं प्रबोधन करणार आहे. तर वाहनांच्या चाकात हवे ऐवजी नायट्रोजन भरण्याची सुविधा प्रत्येक पेट्रोल पंपावर एम.एस.आर.डी. सी.कडून लवकरच करण्यात येणार आहे. चाकाच्या घर्षणामुळं हवेचा दाब वाढून टायर फुटून अपघातच प्रमाणही वाढते. मात्र, टायरमध्ये नायट्रोजन भरल्यास नायट्रोजन प्रसरण पावत नाही आणि त्यामुळं टायर फुटून अपघात होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळं समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघात बघता आता प्रशासन गंभीतेने पावलं उचलत असल्याचं चित्र आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


दिवसभरात काय काय होणार आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते... राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्रात दिवसभरात काय काय महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत, याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर असणार आहेत. दोघांच्या भाषणाकडे पुणेकरांचं लक्ष लागलेय. त्याशिवाय आज वर्षातील पहिलीच शनी अमावस्या आहे. तर मुंबईतील गोखले ब्रिजसाठी पश्चिम रोल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडणार आहेत.... 


मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. त्या आरोपांची आता चौकशी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बैठक होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सहभागी होणार नाहीत.


अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची बैठक


कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केल्यानंतर दिल्लीतील वातावरण तापल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बैठक होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सहभागी होणार नाहीत.


नांदेडच्या सीमावर्ती भागात तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची बैठक 


नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षांच्या आमदार, खासदारांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या आज भारत राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदारांसोबत सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहेत. दोन खासदार आणि तीन आमदार या बैठकीसाठी येणार आहेत.


पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा 


पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तो डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचेल. या मोर्चात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या, धनंजय देसाई यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक असे सर्व नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. 


अमरावतीमध्ये शंकरपाट स्पर्धा 
 
बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली आहे. या उत्साहात बहार आणण्यासाठी बहिरम परिसरात आमदार बच्चू कडू यांच्याकडून शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान हे शंकरपट होत असून यात मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली असून तळेगाव दशासर शंकरपटात सहभागी झालेल्या बैलजोड्यासह राज्यभरातुन तसेच शेजारच्या मध्यप्रदेश राज्यामधूनही स्पर्धक दाखल झालेत.


अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीची सभा


अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सायंकाळी 5:00  वाजता हिंदू राष्ट्र-जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रोफेसर चौक येथील जॉगिंग पार्क येथे ही सभा होणार असून याला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव, सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि रागेश्री देशपांडे या सभेत बोलणार आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.