नवी दिल्ली: लोकसभेत विरोधकांची ताकद वाढल्यानंतर आता राज्यसभेतही मोदी सरकारचं टेन्शन वाढलं आहे. तीन तलाक, सीएए आणि कलम 370 प्रकरणी भाजपची साथ देणाऱ्या ओडिशातील बीजू जनता दलाने (BJD) आता एनडीएला रामराम केल्याचं चित्र आहे. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी घोषणाबाजी करत बीजेडीच्या खासदारांनी वॉक आऊट केलं. बीजेडीकडे राज्यसभेत 9 खासदार आहेत. 


राज्यसभेत सध्या एकूण 245 खासदार आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला 123 खासदारांच्या पाठिंब्याची गरज असते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे राज्यसभेत केवळ 114 खासदार आहेत. कोणतेही विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांना आणखी 11 खासदारांची आवश्यकता असेल.


यावेळी ओडिशामध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका झाल्या असून दमदार कामगिरी करत भारतीय जनता पक्षाने (BJP) बिजू जनता दल (BJD) ला राज्यातील सत्तेतून हद्दपार केले. निवडणुकीपूर्वी ओडिशात भाजप आणि बीजेडी यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण तसे झाले नाही. 


आतापर्यंत भाजपला पाठिंबा


नवीन पटनायक यांचा बीजेडी राज्यसभेत भाजपच्या संकटमोचक पक्ष म्हणून राहिला आहे. लोकसभेत जेव्हा जेव्हा विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हा बीजेडीने भाजपला पाठिंबा दिला. कलम 370 रद्द करण्याचे विधेयक, तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारे विधेयक आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAA) यासह अनेक महत्त्वाच्या प्रसंगी नवीन पटनायक यांची भाजप भाजपसोबत उभी राहिली आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बीजेडी आता भाजपसोबत नाही. 


बीजेडी नेत्यांचा सभात्याग 


3 जुलै रोजी इंडिया आघाडीच्या पक्षांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून वॉकआउट केले. त्यामध्ये बीजेडीचाही भारत आघाडीसोबत सहभाग होता. 


2014 ते 2024 या दरम्यान भाजप लोकसभेत स्वबळावर विधेयके मंजूर करून घेत असे, कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता. राज्यसभेत भाजपला बहुमत नसताना बीजेडी आणि वायएसआरसीपी त्यांच्या पाठीशी उभे होते. 


पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत होते तेव्हा बीजेडीचे खासदार विरोधी नेत्यांसोबत उभे राहून गोंधळ घालत होते. त्यानंतर बीजेडी खासदारांनी घोषणाबाजी केली आणि संसदेतून बाहेर पडले. त्याआधी 28 जून 2024 रोजी सभागृहात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी NEET मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्यामध्ये बीजेडी नेतेही सामील होते.


आता बीजेडी भाजपच्या विरोधात 


ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी त्यांच्या पक्षाच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांचा पक्ष ओडिशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आता भाजपला पाठिंबा देणार नाही, तर फक्त विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. सध्या राज्यसभेत बीजेडीचे 9 सदस्य आहेत. त्याचवेळी राज्यसभेत भाजपकडे अद्याप स्वबळावर बहुमत नाही.


ही बातमी वाचा: