सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे विजेचा धक्का बसल्याने जवळपास 24 म्हशींचा मृत्यू झाला आहे. पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या या 24 म्हशी (Buffalo) होत्या. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या. मात्र, विजेची तार (Electricitiy) तुटून त्या ओढ्यात पडली होती. त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला आणि या दुर्दैवी घटनेत 24 मुक्या जीवांचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यासोबतच, भजनावळे यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे.
पावसाळा सुरू असल्याने सध्या विजेच्या तारा तुटणे, झाडपडी होणे आणि लाईट जाणे हे प्रकार सर्रास होत असतात. पावसामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो, पण तो खंडीत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही ठिकाणी पडलेल्या वीजेच्या तारांमुळे वीजेचा प्रवाह इतरत्र वाहतो. वीजेचा हा वाहणारा प्रवाह अनेकदा मोठ्या दुर्घटनेस कारणभूत ठरतो. त्याचप्रमाणे आता मुक्या जीवांसाठी हा करंट कर्दनकाळ ठरला आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील एका ओढ्याच्या पाण्यात करंट उतरला होता, याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती. मात्र, चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या म्हशी पाण्यात उतरल्या आणि ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पाण्यात उतरलेल्या म्हशींसोबत दुर्घटना घडल्याचं लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित म्हशींना पाण्यात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्या उर्वरीत चार म्हशीचा जीव वाचला आहे. दरम्यान, या घटनेची कल्पना तात्काळ महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करुन नैसर्गिक आपत्तीमधून संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर