मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत आज विश्वविजयी टीम इंडियाचं (Team India) अफलातून जल्लोषात स्वागत झालं. भारतीय संघ वेस्टइंडिजवरुन आज सकाळी दिल्लीला पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाहुणचार आणि कौतुकाची थाप स्वीकारुन टीम इंडियाने थेट मुंबई (Mumbai) गाठली. मुंबई विमानतळापासूनच भारतीय खेळाडूंच्या स्वागताला जनसागर उसळल्याचं दिसून आलं. मरीन ड्राईव्ह परिसरात सागराशेजारी जनसागर पाहायला मिळाला. जय हिंद, भारत माता की जय, मुंबईचा राजा-रोहित शर्मा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. क्रिकेट फॅन्ससह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही मुंबईत टीम इंडियाचं स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना टीम इंडियाचं मुंबईत स्वागत करत असल्याचं म्हटलं. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचं स्वागत करतो, असे म्हटले. टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत करतो. रोहित शर्माच्या नेतृत्वात इंडियाने रेकॉर्ड केलाय, 17 वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळेच, मुंबईकर मोठ्या उत्साहाने टीमचे स्वागत करत आहेत, रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबईत विक्रमी गर्दी आहे, मोठा उत्साह देखील आहे. मात्र, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशी विनंती फडणवीसांनी नागरिकांना केली आहे. तसेच, मी पोलिसांशी चर्चा केली होती, पोलिसांनी तयारी केली असून मी पोलिसांच्या संपर्कात आहे. प्रशासन आणि पोलिसांनी मुंबईत वाहतूक व्यवस्था केल्याचंही त्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेवरुन विरोधकांना टोला
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडे पुरेशी मतं आहेत, आम्ही 9 उमेदवार उभे केले आहेत. आमच्याकडे त्यांच्यासाठी पुरेशी मतं आहेत, विरोधकांना घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार कायम ठेवतील, असे म्हणत फडणवीसांनी विधानपरिषद निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या भूमिकेवरुन टोला लगावला.
मुख्यमंत्री शिंदेंकडूनही टीम इंडियाचं स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन करतो. मुंबईत चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे, चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय. पण अशावेळी टीमची गैरसोय होऊ नये, चाहत्यांचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच मरीन ड्राईव्हवर गर्दी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आणि 1983 च्या सामन्याच्या आठवणीही जागवल्या. मी 1983 सालचा तो कपिल देवचा अफलातून कॅचही पाहिला आणि आताचा टर्निंग पॉईंट ठरलेला सूर्याचा कॅचही पाहिला अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत केलं जात आहे, टीम इंडियाचे आपण आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा
मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन