Rohit Sharma : वानखेडे स्टेडियमवर आज विश्वविजेत्या टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. त्याशिवाय ही ट्रॉफी फक्त टीम इंडियाची नाही, तर सगळ्या देशाची आहे, असेही रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर हजारो चाहत्यांसोबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक झाली. त्यानंतर वानखेडेवर जय शाह यांनी 125 कोटींचा चेक सुपूर्द केला. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. 


रोहित शर्माने वानखेडेवर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केले. हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक होते,सूर्यकुमार यादवनेही भन्नाट झेल घेतला, असे रोहित शर्मा म्हणाला.   


रोहित शर्मा काय म्हणाला? 


"ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे. सामना पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे, मला माझ्या या संघाचा अभिमान आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे कौतुक केले. हार्दिक पांड्याने वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकली होती. रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी केली.


 रोहित शर्माने चाहत्यांचे अभिवादन केले
मुंबईकर चाहत्यांचं रोहित शर्माने हातवारे करत अभिवादन केले. आम्हाला विश्वचषक जिंकण्याची जितकी इच्छा होती, त्यापेक्षा जास्त चाहते उत्साही होते. हा संघ खास आहे, या संघाचं नेतृत्व कऱण्याची संधी मिळली, मी खूप लकी आहे, असे रोहित शर्मा म्हणाला.


आजचा नजारा कधीच विसरणार नाही - विराट कोहली


वानखेड़े स्टेडियममध्ये स्वागत समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही टाळ्या वाजवून घेतल्या. आज जे पाहिले ते विसरता येणार नाही, असे तो म्हणाला. विश्वचषकाइतकाच आजचा क्षण माझ्यासाठी खास होता. 


विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरचं पाच षटकं महत्वाची ठरली. जसप्रीत बुमराह हा या पिढीतील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यानं आपल्याला सामन्यात पुन्हा पुन्हा आणले. त्याची गोलंदाजी सर्वोत्तम झाली. रोहित आणि मी, आम्ही खूप दिवसांपासून यासाठी प्रयत्न करत होतो. आम्हाला नेहमीच विश्वचषक जिंकायचा होता. वानखेडेवर ट्रॉफी परत आणणे ही खूप खास भावना आहे, असे विराट कोहली म्हणाला.