मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत आज विश्वविजेता टीम इंडियाचं (Team India) आगमन झालं. सायंकाळी 5 नंतर वर्ल्डकपविजेत्या टीम इंडियाचे सर्वच शिलेदार मुंबईतील विमानतळावर उतरले. त्यानंतर, मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास विशेष बसमधून करण्यात आला. यावेळी टीम इंडियाच्या स्वागताला मुंबईकरांनी (Mumbai) मोठी गर्दी केली होती. वानखेडे मैदानात, मैदानाबाहेर आणि मरीन ड्राईव्ह परिसरात अक्षरश: जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. स्वत: मुख्यमंत्र्यांनी ह्या गर्दीमुळे पोलिस (Police) आयुक्तांना फोन करुन सूचना केल्या होत्या. दरम्यान, रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास चर्चगेट परिसरात आणि वानखेडे स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाल्याने काहीजण गुदमरल्याची माहिती मिळाली.
टीम इंडियाच्या स्वागतसाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले होते. यावेळी, चर्चगेट स्थानकात मोठी गर्दी दिसून आली. याच गर्दीत काहींना अस्वस्थ होऊ लागल्याने तत्काळ रुग्णावाहिकेतून रुग्णालयातून नेण्यात आलं आहे. येथील गेट नंबर 2 च्या बाहेरही मोठी गर्दी दिसून आली. यावेळी, बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी अस्वस्थ झालेल्या तरुणीला आपल्या खांद्यावर उचलून बाजूला नेल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यावेळी, काही ठिकाणी पोलिसांकडून लाठी चार्जही करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा पोलिस आयुक्तांना फोन
प्रचंड संख्यने जमलेल्या उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. टी-20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे नियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.
फडणवीस म्हणाले, मी पोलिसांच्या संपर्कात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचं स्वागत करतो, असे म्हटले. टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत करतो. रोहित शर्माच्या नेतृत्वात इंडियाने रेकॉर्ड केलाय, 17 वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळेच, मुंबईकर मोठ्या उत्साहाने टीमचे स्वागत करत आहेत, रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत विक्रमी गर्दी आहे, मोठा उत्साह देखील आहे. मात्र, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशी विनंती फडणवीसांनी नागरिकांना केली आहे. तसेच, मी पोलिसांशी चर्चा केली होती, पोलिसांनी तयारी केली असून मी पोलिसांच्या संपर्कात आहे. प्रशासन आणि पोलिसांनी मुंबईत वाहतूक व्यवस्था केल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
या संघाचा मला अभिमान, ही ट्रॉफी संपूर्ण देशाची - रोहित शर्मा