Maharashtra News Updates 12 November 2022 : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का, 5.4 रिश्टर स्केलची नोंद
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापूर -
सोलापुरात एका प्रतिष्ठित डॉक्टरकडून वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
खरकटे पाणी अंगावर का टाकले विचारल्याने डॉक्टराने फायबर काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप
सोलापुरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप आडके असे मारहाण करणाऱ्या डॉक्टराचे नाव
गवंडी कामगार विजय चौधरी यांना डॉक्टरकडून मारहाण
या बेदम मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडल्याची पोलिसात फिर्याद
डॉ. आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अनुसार सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
दरम्यान संदीप आडके यांनी देखील विजय चौधरी यांच्या विरोधात सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली
चौधरी दारू पिऊन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा डॉक्टरांनी केला आरोप
डॉक्टरांच्या तक्रारीनंतर गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का, 5.4 रिश्टर स्केलची नोंद
दिल्लीतही भूकंपाची तीव्रता जाणवली
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातही जाणवले भूकंपाचे धक्के
मागील 15 दिवसात नेपाळमध्ये भूकंपाचा तिसरा धक्का
नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का, ५.४ रिश्टर स्केलची नोंद, दिल्लीतही भूकंपाची तीव्रता जाणवली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातही जाणवले भूकंपाचे धक्के
मागील १५ दिवसात नेपाळमध्ये भूकंपाचा तिसरा धक्का
Sangli News Update : चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुगवाड याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशी "धम्मभूमी" उभारण्यात आली आहे. शानदार सोहळ्यात बौद्ध भिक्खूंच्या हस्ते धम्म भूमीचा लोकार्पण सोहळा पार पडला. बुद्ध विहारच्या इमारतीत थायलंडवरून आणलेली बारा फूट उंचीची पंचधातूच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी हजारो लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून धम्मभूमी साकारली आहे. खासगी खर्चातून उभा केलेला हा देशातील पहिला प्रयोग आहे. या धम्म भूमीवर आता बुद्ध विहार, भिकू ट्रेनिंग सेंटर, लायब्ररी, यूपीएससी एमपीएससी ट्रेनिंग सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे.
Wardha News Update : भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वर्धा आणि हिंगणघाट येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी वर्धा जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या संख्यांच्या बरोबरीने असली पाहिजे असे नियोजन करा, असे चित्रा वाघ या कार्यक्रमाच्या वेळी म्हणाल्या.
Solapur News Update : सोलापुरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे. आग लागलेल्या कारखान्यात चादर आणि टॉवेल निर्मिती करण्यात येत होती. निलम नगर भागात हा कारखाना असून आगीत कारखान्यातील सर्व मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे. कारखान्यातील कामगार वेळीच बाहेर पडल्याने त्यांना कोणतीही इजा नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Belgaum News Update : बेळगावमधील सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावाजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पलटी झाली आहे. यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. यावेळी बसमधून करिकट्टी, असुंडी गावातून शाळेला जाणारे 38 विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. बस पलटी झाल्यामुळे बारा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धारवाड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे ठाण्याचे डीसीपी विनय कुमार राठोड यांची झोन 5 मधून वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे. आव्हाडांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, तुम्हाला माहिती नाही ठाण्यातील वाहतूक शाखेतील पोस्ट किती महत्वाची आहे, त्यांना हे बक्षीस मिळालं आहे असं समजा.
पोलिसांची हतबलता त्यांच्या डोळ्यात दिसत होती. मला नोटीस देण्यासाठी बोलावून घेतले आणि अटक केली. परंतु, कोणाच्या तरी दबावामुळे मला अटक करण्यात आली, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
Bachchu Kadu : "राज्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयाबाबत बोललो होतो. मात्र कोरोना आणि उद्धव ठाकरेंच दुर्लक्ष यामुळे काम मागे पडलं. लोकं म्हणतात मी खोके घेऊन गोहाटीला गेलो, मात्र मी दिव्यांगांच्या वेदना घेऊन गोहाटीला गेलो होतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला आणि आज मंत्रालय स्थापन होत आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री झाल्यावर इतका आनंद होणार नाही जो आज मंत्रालय स्थापन झाल्यामुळे होत आहे. कुणी मराठा समाजाचे प्रश्न मांडले, कुणी धनगर आणि अल्पसंख्यांक यांचे प्रश्न मांडले. आम्ही मात्र दिव्यांग बांधवांचे प्रश्न सभागृहात मांडले. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नेहमी ऋणात राहू. दिव्यांग मंत्रालयाचा मंत्री झालो तर अधिक जोमाने दिव्यांग बांधवांसाठी काम करू", असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.
Mumbai News : खासदार गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात अंधेरी पश्चिमेत शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे गटाचे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील खाबिया यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले. त्यांनी अंधेरी पश्चिम परिसरात ठिकठिकाणी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या बॅनर, पोस्टर, नेमप्लेटला काळे फासून आंदोलन करत आहेत.
Pune News : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील एका कुरियर कंपनीत दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी या कंपनीतून 28 लाखांची रोकड लंपास केली आहे. मास्क घातलेल्या दरोडेखोरांनी या कुरियर कंपनीत प्रवेश केला आणि दहशत माजवण्यासाठी बंदुकीतून गोळीबार केला. त्यानंतर कुरियर कंपनीतील रक्कम घेऊन पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन एका प्रेक्षकाला मारहाण केली, त्यांनी तिथे जाऊन तमाशा केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Shivsena Protest : अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रिज वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मात्र, यामुळे अंधेरीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. गोखले ब्रिज पूर्णपणे बंद न करता एक बाजूने वाहतूक सुरू करता येऊ शकते असे असतानाही रेल्वे प्रशासन महापालिका प्रशासन यांच्याकडून हा अभूतपूर्व गोंधळ निर्माण करण्यात आला. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज गोखले पुलाजवळ आंदोलन केले. जर आठवडाभरात या वाहतूक कोंडीवर तोडगा काढला नाही तर पुढील आठवड्यात शिवसेना तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले.
गोखले ब्रिज वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीत कोंडीचा सामना करावा लागत आहे त्यात शाळा देखील सुरू झाल्या आहेत. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागत आहे. याला रेल्वे प्रशासन महापालिका प्रशासन यांचे मिसाळ नियोजन जबाबदार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणणे असून या विरोधात शिवसैनिकांनी अंधेरीतील साईवाडी परिसरात तीव्र आंदोलन करून आज रेल्वे प्रशासन आणि महापालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले ते गोरेगाव या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गोरेगाव नेस्को इथे एका कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात वाहने आली आहेत. या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन नसल्याने ही वाहने पश्चिम द्रुतगती मार्गावर उभी आहेत. यामुळे या मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गोरेगाव ते विलेपार्ले पर्यंत हजारो वाहने कोंडीत अडकली आहेत. यात काही रुग्णवाहिका देखील अडकलेल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांना का जामीन देवू नये असा अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी ठाणे कोर्टात दिला आहे. जितेंद्र आव्हाड हे बलवान राजकीय व्यक्तीमत्व असल्याने तपासात बाधा आणू शकतात, तसेच साक्षीदारांना धमकावू शकतात असा अभिप्राय तपास अधिकाऱ्यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jitendra Aavhad : थोड्याच वेळात जितेंद्र आव्हाडांच्या जामीनावर सुनावणी... आव्हाडांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी... जामीनावर थोड्याच वेळात निर्णय...
जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित विवियाना मॉलमध्ये प्रेक्षक मारहाण प्रकरणात एका तासात निर्णय होणार आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला केला आहे. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी आपला अभिप्राय कोर्टात दाखल केला आहे. आता या प्रकरणी एका तासामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे.
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. ठाण्यातल्या (Thane News) विवियाना मॉलमधील (Viviana Mall) मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज कळमनुरी (हिंगोली) मध्ये काही वेळात दाखल होईल. त्या पूर्वी या भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर धनगर समाज बांधव सहभागी होणार आहे. त्यासाठी काठी आणि घोंगडी घेऊन दाखल झाले आहेत. समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही सर्वजण सहभागी होत असल्याची माहिती दिली आहे.
Belagavi News : लॉकअपमध्ये डेथ झालेल्या व्यक्तीचे नाव बसन गौडा यल्लनगौडा पाटील (45) असे असून बेळगाव पोलिसांनी त्याला गांजा विक्री प्रकरणी बेल्लद बागेवाडी येथून शुक्रवारी दुपारी अटक केली होती.पोलिसांच्या माहितीनुसार त्याला बेळगावला घेऊन येत असताना काकती येथे त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर तेथील स्थानिक डॉक्टरांकडे दाखवून त्याला ग्रामीण पोलीस स्थानकात आणण्यात आले. तेथे चौकशी सुरू असताना त्याने उलटी केली. नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर दीड तासांनी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम.बी.बोरलिंगय्या यांनी दिली.
Nandurbar News : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नंदुरबार जिल्ह्यातून अंकलेश्वर - ब्रहानपूर, आणि नेत्रंग - शेवाळी, नागपूर - सुरत, हे तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मात्र, संबंधित प्रशासन लक्ष देताना दिसून येत नाही. नंदुरबार शहरातून जाणारा नेत्रंग शेवाळी महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. शहरातून करण चौफुली तर सीबी पेट्रोल पंपापर्यंत या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे झाले असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातून जाणारा नेत्रंग - शेवाळी महामार्गावरून दररोज हजारो वाहन गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून गुजरात राज्यात ये-जा करत असतात. त्यामुळे आता हा रस्ता लवकरच कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Maharashtra News : घरगुती गॅसचे दर हजार रुपयांवर गेले आहेत. वाढत्या महागाईचा चटका सर्व सामान्यांना बसत आहे. दुसरीकडे सबसिडी ही वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांपुढील समस्या वाढल्या आहेत. उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी झालेल्या महिलांना गॅस सिलेंडर कसा भरावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात गॅस बाजूला सारून महिला चुलीचा आधार घेत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
Nandurbar News : ग्रामीण भागातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे विविध योजनांचे अनुदान येत असते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींसाठी 2020 -21 साठी अनुदान येऊन पडले असले तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांपर्यंत अनुदान न पोहोचल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी चांगला संताप व्यक्त केला. अनुदान उपलब्ध असूनही वाटप का होत नाही? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ग्रामीण भागातील कामांना गती देणाऱ्या अनेक योजना असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी केला.
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भारत संचार निगम कंपनीची मोबाईल सेवा गेल्या आठ दिवसांपासून प्रभावित झाली असून याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसून येत आहे. मोबाईल सेवा प्रभावित असल्यामुळे, आरोग्य सुविधांसह विविध सुविधांवर परिणाम होत आहे. तसेच, शासकीय योजनेचे अर्ज किंवा ऑनलाईन कामांवर परिणाम होत असल्याने ग्रामीण भागातील मोबाईल सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या रुग्णवाहिका यांनाही कॉल करता येत नसल्याने अत्यावश्यक सुविधा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Politics : ठाकरे सरकारची महत्त्वकांक्षी योजना शिवभोजन थाळीच शिंदे -फडणवीस सरकार करणार सोशल ऑडिट
सोशल ऑडिट करण्यासाठी यशदा आणि टिस या संस्थांना पाचारण
प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांकडून घेणार माहिती
या योजनेचा किती लाभ झाला? यामध्ये काही सुधारणा करणे अपेक्षित आहे का?, योजनेत पारदर्शकता आहे का? यासारखी माहिती गोळा करणार
ज्या सेंटर संदर्भात तक्रारी आहेत ते सेंटर चालू ठेवायचं की बंद करायचं यावरती निर्णय होणार
संपूर्ण राज्यातून ही माहिती गोळा झाल्यानंतर शिव भोजन थाळी योजनेत बदल करणार
सरकार वरती टीका झाल्यानंतर सध्या तरीही योजना बंद करणार नाही. मात्र काही बदल केले जाणार
'पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली'... जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...
Maharashtra Kolhapur Crime News : सैराट चित्रपटातील कहाणीप्रमाणे आंतरजातीय विवाह केलेल्या बहीण आणि तिच्या पतीची हत्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना कोल्हापुरातील न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पन्हाळा तालुक्यातल्या मेघा पाटील हिने प्रियकराबरोबर आंतरजातीय विवाह (Intercaste Marriage) केला होता. या लग्नाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. लग्नानंतर कसबा बावडा इथं राहणाऱ्या मेघा आणि तिच्या पतीची तिच्या सख्ख्या भावांनी हत्या केली होती. 2015 साली या घटनेच्या आधी सैराट चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे कोल्हापुरातील ऑनर किलिंगच्या या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती.
Maharashtra News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना भोंदू बाबा म्हणत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक होत आंदोलन केलं. नागपूरच्या चितार ओळी परिसरात गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. हातात निषेधाचे बॅनर घेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करत जोरदार घोषणा दिल्या आहेत. यावेळी बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करण्यापूर्वी एकनाथ शिंदेना शिवसेनेतून बाहेर काढत स्थापन केलेले सरकार जादूटोणा करून केले का? असा सवाल राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी उपस्थित केला. तसेच या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे पोलीस स्टेशनला जाऊन जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचंही सांगितलं.
आणखी एक मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. औद्योगिक क्लस्टर मध्य प्रदेशला होणार आहे. वेदांता-फाॅक्सकाॅनवरुन टीका होत असताना आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटला आहे. केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यास राज्याला अपयश आलं आहे.दरम्यान, हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच मध्य प्रदेशला गेल्याचं समोर आलं आहे. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार 30 जून रोजी आलं, त्याआधीच हा प्रकल्प मध्यप्रदेशला गेला.
Save Aarey : आरे बचाव मोहिमेसाठी लढा देणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्याला तडीपारीपासून दिलासा मिळाला आहे. पोलिसांकडून पर्यावरणवादी कार्यकर्ता तबरेज सय्यद याला आपला सविस्तर जबाब नोंदवण्यासाठी 9 डिसेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. आरे वाचवा मोहिमेतील तबरेज सय्यदला तडीपारीची नोटीस पोलिसांनी पाठवल्यानंतर आंदोलकांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. 9 डिसेंबरपर्यंत जबाब नोंदवण्यास पोलिसांनी वेळ दिल्याने तोपर्यंत तरी तबरेजला तडीपारीतून दिलासा मिळाला आहे.
Raigad Bus Accident : माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर सहलीवरुन परत येणाऱ्या बसला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळली आहे. यामध्ये 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ते प्रवासी किल्ले रायगडावर गेले होते. परतत असताना बसला हा अपघात झाला आहे. हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.
Mumbai News : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचा एका महिलेवर हल्ला.
आरे कॉलनी आदर्श नगर परिसरामध्ये राहणाऱ्या संगीता गुरव काल संध्याकाळी घरी जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
बिबट्याचा या हल्ल्यामध्ये महिलेला डोक्याला मोठी जखम झाली आहे. सध्या संगीता गुरव यांच्यावर ट्रॉमा केअर रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत.
दिवाळीच्या दिवशी आरे कॉलनी 15 नंबर युनिटमध्ये बिबट्यानं एक दीड वर्षाची मुलीवर हल्ला केला होता त्यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर बोरिवली वन विभागाची टीम ॲक्शन मोडमध्ये येऊन दोन बिबट्यांना पिंजरा लावून ट्रॅप केलं होतं.
सध्या आरे कॉलनी परिसरामध्ये आठ ते दहा बिबट्याचा वावर असल्यामुळे आरे कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे आणि वस्ती असल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.
Twitter $8 Subscription Plan Suspended : ट्विटर ( Twitter ) कंपनीने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या ( Twitter Blue Tick ) पेड सबस्क्रिप्शनचा ( Twitter Paid Subscription ) निर्णय रद्द केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सेवा बंद केली आहे. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या ( Fake Account ) संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
Himachal Voting Today : हिमाचल प्रदेशातील 68 विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये शांततापूर्ण मतदानासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 67 कंपन्यांसह सुमारे 30,000 सुरक्षा कर्मचारी आणि 11,500 राज्य पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय जवळपास 50 हजार सरकारी कर्मचारी पोल ड्युटीवर आहेत.
Chiplun News : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह मातीच्या भरावयाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरू आहे.मात्र या वर्षाच्या उन्हाळ्यात आणि त्यानंतरच्या पावसाळ्यात घाट बंद करण्यात आल्याने मोठ्या समस्यांना समोरी जावे लागले. माथ्यावर असलेल्यांची शेती खाली असल्याने व दैनंदिन व्यवहारही चिपळूणच्या बाजारपेठेशी असल्याने सहाजिकच घाट बंद कालावधीत त्यांना घरातच अडकून पडावे लागत होते. शाळांनाही सुट्टी दिली गेली गेल्याने तसेच घाटाच्या वरील बाजूस लोटे MIDC असल्यामुळे चिपळूनातून येजा करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानें त्यांनाही अडचणींना समोर जावे लागले होते. त्यामुळे यावेळी मात्र घाट बंद करण्यास परशुराम ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीकडून सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. भंडाऱ्यात ते दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमीपूजन करतील. दुपारी 3.30 वाजता खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे त्यांची जाहीर सभा होईल. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन
जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेविरोधात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीकडून सकाळी 11 वाजता आंदोलन केलं जाणार आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कळमनुरी, हिंगोली येथून सुरू होणार
काँग्रेसची भारत जोडो यात्रा कळमनुरी, हिंगोली येथून सुरू होणार आहे. सकाळी सहा वाजता यात्रेला सुरुवात होईल.
मुख्यमंत्री भंडारा जिल्हा दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. भंडाऱ्यात ते दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमीपूजन करतील. दुपारी 3.30 वाजता खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे त्यांची जाहीर सभा होईल.
भंडारऱ्यात शेतकरी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार
आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे धान केंद्र सुरू न केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू करेमोरे यांनी दिला आहे.
काँग्रेस आज गुजरात निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहीर करणार
काँग्रेस आज गुजरात निवडणुकीसाठी घोषणापत्र जाहीर करणार आहे. सकाळी 11.30 वाजता घोषणा पत्र जाहीर केले जाईल.
अजित पवार पुण्यातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार
विरोधी पक्षनेते अजित पवार पुण्यातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची दुपारी साडे तीन वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात गुगवाड येथे 'धम्मभूमी' लोकार्पण सोहळा
सांगली- दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यात धम्मभूमी. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बुद्ध विहार आणि धम्मभूमी. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात गुगवाड येथे 'धम्मभूमी' लोकार्पण सोहळा आहे. वीस एकर क्षेत्रामध्ये बुद्ध विहार, भिकू ट्रेनिंग सेंटर, लायब्ररी, यूपीएससी एमपीएससी ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांची जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी भेट आणि चर्चाही आहे. दुपारी 12 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -