इस्लामपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचे आवाहन केले होते. अलीकडेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले होते. महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्र उभारण्याची, सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर जयंत पाटील महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता यावरून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जयंत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. 


सदाभाऊ खोतांचा जयंत पाटलांना टोला


इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवलीय. इस्लामपूरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून काहीजण भावनिक राजकारण करत आता संधी आल्याचे सांगत आहेत. पण तिथे मुख्यमंत्री व्हायला 145 गडी लागतात, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. 


निशिकांत पाटील आमदार होणार


आमच्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास देखील सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलाय. जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांना आमदार करण्यासाठी आम्ही सगळे एक झालोय. आता निशिकांत पाटील आमदार होणार आहेत आणि ते आमदार झाल्यावर मी नामदार होणार आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. दरम्यान, ही सभा सुरु असताना एकाने 10 वाजत आले आहेत, प्रचार वेळ संपत आलीय, असे सदाभाऊ खोत यांना खुणावले. यावर  माझ्या हातातील घड्याळ हे निवडणूक आयोगाचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. यानंतर सभेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.  


आणखी वाचा


शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?