Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2023 10:07 PM
कळवा रेलवे स्थानकाला लागून आसलेल्या गवताला आग

कळवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ला लागून असणाऱया मोकळ्या जागेतील सुक्या गवताला अचानक संध्याकाळी ७ च्या सुमारास आग लागली..रेल्वे मार्गिकेला अगदी लागून असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणे साठी ठाणे अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले..सुमारे अर्धा तासाने म्हणजे साडेसात च्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुठल्याही प्रकारची वित्त हानी किंवा मोठा अपघात घडला नसून रेल्वे वाहतूकही सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती देण्यात आलीय..

सोशल मीडियावर भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल


निलेश राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि अश्लील ट्विट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे


राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे


पुणे सायबर पोलिस विभागात या प्रकरणी योगेश शिंगटे यांनी तक्रार दिली होती


 ही घटना ११ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान घडली. राहुल मगर या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंट @राहुलमगर32 याने भाजप चे माजी खासदार नीलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डल @meNeelesNRane यावर अश्लील भाषेत ट्विट केले होते. तसेच ठाण्यातील शिवानी गोखले नावाच्या महीलेबद्दल देखील या राहुल मगर नावाच्या व्यक्तीने ६ मार्च रोजी ट्विटर वर अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत ट्विट केले होते. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणी राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आज पुन्हा एकाच दिवशी 4 बालविवाह रोखले
परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे सत्र सुरूच आहेत.आज पुन्हा गंगाखेड तालुक्यात एकाच दिवशी चार बालविवाह रोखण्यात प्रशासनाच्या पथकाला यश आल असून मागच्या चार दिवसात जिल्ह्यात नऊ बालविवाह रोखले गेले आहेत बाल विवाह मुक्त परभणी अभियाना अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे..

 

परभणी जिल्हा बालविवाह लावण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालविवाह मुक्त परभणी हे अभिमान सुरू केले असुन या अभियानांतर्गत चाईल्ड लाईन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे पथक तयार करण्यात आले आहे जे बालविवाह बाबत माहिती मिळाली की तात्काळ कारवाई करतंय.4 दिवसांपूर्वी जिंतुर आणि सोनपेठ मध्ये एकाच दिवशी 5 ठिकाणी लावण्यात येणारे बालविवाह या पथकाने रोखले होते आज पुन्हा हा प्रकार गंगाखेड तालुक्यात होत होता 4 ठिकाणी होणारे बालविवाह आज या पथकाने रोखले असुन यातील अल्पवयीन वधू वरांसह त्यांच्या पालकांना बालकल्याण समिती समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे..
वसई-नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रात दोन तरुण बुडाले

वसई-नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रात दोन तरुण बुडाले आहेत. आज रविवार विकेंड साजरा करण्यासाठी नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा येथील श्रीरामनगर येथे राहणारे चार तरुण हे दुपारी दोनच्या सुमारास कळंबच्या समुद्रकिनारी आले होते. दुपारी तीनच्या सुमारास यातील दोन तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील रोशन गावडे आणि सौरभ पाल हे  तरुण बुडाले. तर विकास सहाणी आणि रमेश मोरे हे पाण्यात न उतरल्याने वाचले आहेत. रोशनचा मृतदेह आज साढे पाच वाजता वसईच्या भुईगांव समुद्रकिनारी मिळाला आहे. तर सौरभचा मृतदेह अद्याप सापडला नाही. वसई पोलीस सौरभच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

जे कोणी जबाबदार आहेत त्यांचा मास्टर माईंड लवकरच पकडावा, व्हायरल व्हिडीओवर शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दिली आहे. यावरच आता पत्रकार परिषद घेऊन शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत की, ''माझी विनंती आहे की जे कोणी जबाबदार आहेत त्यांचा मास्टर माईंड लवकरच पकडावा.'' 

शिर्डी साईंच्या शिर्डीत रंगोत्सव

साईबाबांची शिर्डी आज रंगपंचमी निमित्ताने स्पतरंगानी न्हाऊन निघालीय....रंगपंचमीची मोठी धूम शिर्डीत दिसून येतेय....आज सकाळापासुनच हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल झाले होते...रंगपंचमी निमित्ताने आज साईबाबांच्या रथाची मिरवणुक काढण्यात आली... द्वारकामाईतून रथ बाहेर पडताच साईबाबांच्या रथावर तसेच रथासमोर भाविकांनी रंगाची मुक्त उधळण करत साईनामाचा जयघोष केला....साई की निकली सवारी साई की लिला है न्यारी असे गुनगान करत भाविकांनी साई भजनावर ठेका धरला...नृत्यात तल्लीन होत भाविकांनी रंगोत्सव साजरा केला.

चिंचवली गावा जवळ लागलेल्या वनव्यात पोल्ट्री फार्म मधील 2500 पिल्ले होरपळली

सध्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वणवा लागण्याचे सञ मोठ्या प्रमाणात असुन काल राञी लागलेल्या वणव्यात  योगिता म्हसकर या विधवा महिलेने कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतः गुतंवणूक करुन नवीनच सुरूवात केलेल्या पोल्ट्री फार्म मधील २५०० हजार पक्षी होरपळून मेले असून ते फक्त दहा दिवसाचे होते.

वर्ध्याच्या देवळीत कर्तबगार महिलांचा गौरव

वर्ध्याच्या देवळी इथं भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला मेळावा व समाजातील कर्तबगार महिलांचा गौरव प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी पाच महिलांचा पैठणी व साडी चौळी विशेष सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शोभा तडस, सरिता गाखरे, वैशाली येरावार उपस्थित होत्या. 

वाळवा येथे राष्ट्रवादी व हुतात्मा गट आमनेसामने

वाळवा येथील नवीन पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित पार पडला.  या कार्यक्रमाला विरोध करत गौरव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज हुतात्मा गट काळे झेडे घेऊन सकाळ पासून हुतात्मा चौकात उभे होते. तर वाळवा येथे  जयंत पाटील नवीन पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन करणार असतील तर त्यांना पुर्ण ताकदीने विरोध केला जाईल असा इशारा गौरव नायकवडी त्यांनी दिला होता. वाळव्यात नवीन पाणी योजनेला सध्याच्या सरकारने निधी दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष बाब म्हणून निधी दिला आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी प्रयत्न केले आहेत. वाळवा - कामेरी, वाळवा - आष्टा रस्त्याला निधी कोणी दिला आहे. यांची माहिती जनतेला आहे. या कामासाठी कोणताही संबंध नसताना आमदार जयंत पाटील उद्घाटने करत आहेत. हे चुकीचे असून आम्ही जयंत पाटील यांचा निषेध करत असल्याचे गौरव नायकवडी म्हणाले तर जयंत पाटील हे भूमिपूजन करून जात असताना हुतात्मा चौकात काळे झेडे दाखवण्यासाठी उभे असणाऱ्या हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्याच्या दिशेने हात करून स्मित हाश्य केल्याने हुतात्मा गट आक्रमक झाला.  यावेळी दोन्ही गट आमने सामने आले, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाद टळला. 

वादग्रस्त स्टेटमुळे शेवगावात तणाव

शेवगाव शहरात काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्याने शेवगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे...संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर एकत्र आरोपीवर कठोर करावाईची मागणी केली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्यानंतर तणाव निवळला... मात्र, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी उदया शेवगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे...याप्रकरणी शेख एजाज लाला , सय्यद अमानअली आसिर अशी आरोपींची नावं असून या आरोपीनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंजेबाशी करणारे स्टेट्स ठेवल्याने हा वाद निर्माण झाला...दरम्यान उद्या सकाळी सकाळी 10 वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध नोंदवला जाणार आहे...त्यानंतर शहरातून निषेध मोर्चा देखील काढला जाणार आहे...सकल हिंदू समाजाच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.

Bagad Yatra : साताऱ्यातील बगाड यात्रेचा उत्साह, लाखो भाविकांचा जल्लोष

Satara Bagad Yatra : साताऱ्याच्या बावधनमधील भैरवनाथाच्या बगाड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे. साताऱ्याच्या बावधनमधील भैरवनाथाची बगाड यात्रा (Bagad Yatra) फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन हे डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव. या गावची बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेपैकी एक मानली जाते. बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक बावधनमध्ये दाखल झाले आहेत. 50 फुट उंच लाकडी बगाडाला बांधून बैलजोडीच्या साहाय्याने शेतातून पळवून नेण्याची परंपरा आहे.

Tulaja Bhavani Rang Panchami : तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला रंग लावण्यात आला. विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला आज भाताचा नैवैद्य अर्पण करण्यात आला, तोही विविध रंगाचा असतो तसेच देवीचे पारंपरिक अलंकारांसह खोबऱ्याचा हार घालण्यात आला. देवीचे महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली. त्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यात आले.तत्पूर्वी देवीचे विविध अलंकार घालून पूजा करण्यात आली त्यानंतर रंगांची उधळण केली.


 
Success Story : गोंदियाच्या मातीत फुलला स्ट्रॉबेरीचा मळा, व्यवसाय सांभाळून यशस्वी प्रयोग, वाचा संजय जसाणींची यशोगाथा

Strawberry Success Story : सध्या शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेत आहेत. असाच एक स्ट्रॉबेरी (Strawberry) शेतीचा यशस्वी प्रयोग गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं केला आहे. संजय जसाणी (Sanjay Jasani) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. योग्य व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या बळावर प्रतिकुल भौगोलिक वातावरणातही गोंदिया जिल्ह्यातील एका शेतकर्‍यानं लालबुंद स्ट्रॉबेरीतून चांगल उत्पादन घेतलं आहे.

Women's Bike Rally : वुमन्स ऑन विल बाईक रॅलीमध्ये 500 हून अधिक महिलांनी घेतला सहभाग
Mumbai Women's Bike Rally : जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचे कलाकार यांनीही वुमन्स ऑन विल बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. अशातच आज मुंबई येथील शिवाजी पार्क येथे एका वेगळ्याच कार्यक्रमाचे आयोजन महिलांकरिता करण्यात आले आहे. महिलांना रोजच्या धावपळीतून विरंगुळा मीळावा याच करिता शिवाजी पार्क येथे वुमन ऑन विल बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी यामध्ये तब्बल 500 महिलांनी सहभाग घेतला असून यामध्ये मराठी सिनेमा आणि हिंदी सृष्टीतील काही कलाकार देखील बाईक रॅलीमध्ये सहभाग घेणार आहे.
Sunil Mendhe : भाजप खासदार सुनील मेंढे उतरले कबड्डी मैदानात, खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन

Sunil Mendhe : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सध्या भाजपचे खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी इथं पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत खुद्द भाजपचे खासदार सुनील मेंढे हे खेळाडू म्हणून मैदानात उतरले. एवढेच नव्हे तर, 55 वर्षीय खासदारांनी तरुण खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचा खेळ करून त्यांनी विरोधी चमुच्या खेळाडूंना अडचणीत आणून गडी बाद केलेत.

Pandharpur Rang Panchami : पंढरपुरात रंगपंचमीची धूम 



पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो, त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात वसंतपंचमी ते रंगपंचमी पर्यंत रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे. या संपूर्ण कालावधीत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र परिधान करून त्यावर रोज नैसर्गिक रंगाची उधळण होत असते. याच सोहळ्याचा आज अंतिम दिवस अर्थात रंगपंचमी, त्यामुळे या सोहळ्याचा अनोखा उत्सव पंढरपूर शहरात  झाला. आज येथील यमाई ट्रॅकवर शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी नैसर्गिक रंगाची मुक्तहस्ते उधळण करीत रंगपंचमी साजरी केली. यावेळी डीजेच्या तालावर शेकडोच्या संख्येने तरुण तरुणींनी बेधुंद होत ठेका धरला. त्यामुळे आज अक्षरश अबाल वृद्ध या सोहळ्यात सामील झाले होते. यावेळी संपूर्ण पर्यावरण पूरक रंगाची कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.




Navi Mumbai : नवी मुंबई मनपाची सायक्लोथॉन स्पर्धा संपन्न

नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या उद्येश्याने नवी मुंबईत सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पामबीच मार्गावर मोराज सर्कल ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे 8 कि.मी. अंतराची ही सायक्लोथॉन स्पर्धा पार पडली. सायकल हे प्रदूषणविरहित आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लाभदायक असून यामुळे पर्यावरणाचीही जपणूक होत असल्याने सायकलच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी सायक्लोथॉन 2023 या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने नवी मुंबईकरांनी आपला सहभाग नोंदविला.

Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांचं निधन

Madhuri Dixit Mother Snehlata Dixit Passed Away : अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit) आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचं आज निधन झालं आहे. अभिनेत्री माधुरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आई स्नेहलता यांचं आज सकाळी 8.40 वाजता निधन झालं आहे. माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी 3.40 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेना खासदारांची तातडीची बैठक

शिवसेना खासदारांची तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलावली असल्याची सूत्रांची माहिती.


वर्षा निवासस्थानी ही बैठक सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती, मात्र बैठकीतील विषयाबाबत अद्याप स्पष्टता नाही.


बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व्यूहरचना आखली जाणार असल्याचं कळतंय.


मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा देखील घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती.


सुप्रीम कोर्टातील निकाल आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंग राज्यसभेत त्यावर हरकतींबाबतही चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी माहिती.


 

Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर अर्टिका कारचा अपघात, 5 ठार..

समृद्धी महामार्गावर अर्टिका कारचा अपघात, 5 ठार..


अपघातात 2 मुले 3 महिला ठार; 7 गंभीर जखमी.


मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर अर्टिका गाडीचा अपघात.


पोलीस घटनास्थळी दाखल.

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात, पुणेकरांशी संवाद साधणार 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात, पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील सहकारनगर या भागात एक कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांना राजकारणात या असे आवाहन केले होते. याच वेळी त्यांनी नागरिकांना भेटायला येईल असे देखील सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज सहकार नगर या ठिकाणी काही नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Telangana Minister : तेलंगाणा सरकारच्या धास्तीने महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प घोषित केला : इंद्रकिरण रेड्डी

बंजारा समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य श्री संत रामराव महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे नुकतेच संपन्न झाले. या पुतळ्याचे अनावरण तेलंगणा राज्याचे वन मंत्री तथा पर्यटन पर्यटन मंत्री इंद्रकिरण रेड्डी आणि किनवट माहूर विधानसभेचे माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते पार पडलं. तेलंगणा राज्याचे वनमंत्री तथा पर्यटन मंत्री इंद्रकिरण रेड्डी हे महाराष्ट्राच्या अर्थ बजेट विषयी बोलताना टीका केली आहे. नांदेडमध्ये बी आर एस पार्टीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के सी आर यांनी शेतकऱ्या विषयी आणि मजूरदारांविषयी जे काही घोषणा केल्या होत्या त्याच घोषणाची धास्ती घेऊन महाराष्ट्र सरकारने आर्थिक बजेट घोषित केलं आहे, असे पर्यटन मंत्री इंद्रकिरण रेड्डी यांनी महाराष्ट्र सरकारवर टिका केली.

Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mega Block on Central and Harbour  Railway : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकल ट्रेननं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. आज रविवारी, 12 मार्च रोजी मध्य रेल्वेकडून (Local Train Mega Block) देखभालीच्या कामांसाठी मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे मार्गांवर (Harbour Railway) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

TMT AC Bus Fare Reduce : मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये

TMT AC Bus Fare Reduce : मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) यादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता एसी बसचा (AC Bus) गारेगार प्रवास आणखी स्वस्त झाला आहे. ठाणे महानगर परिवहन (TMT) मंडळाने एसी बसच्या तिकीटाच्या दरात कपात केला आहे. टीएमटीने बस तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये असणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Rang Panchmi 2023 : देशभरात रंगपंचमीचा उत्साह; काय आहे या सणाची परंपरा? वाचा महत्त्व...

Rang Panchmi 2023 : रंगपंचमी (Rangpanchmi) म्हणजेच रंगांचा सण. हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्णपक्ष पंचमीला साजरा केला जातो. म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांची उधळण करत रंगीबेरंगी रंगात न्हाऊन मोठ्या धूम धडाक्यात हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून वसंतोत्सव सुरु होतो. धूलिवंदनानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Rang Panchami 2023 : देशभरात रंगपंचमीचा उत्साह 

देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. 

Solapur Rang Panchami : आज रंगपंचमीचा उत्साह, रंगगाडा उत्सव जल्लोषात होणार साजरा

सोलापुरात आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळेल. लोधी समाजाचा पारंपारिक उत्सव असलेल्या रंगपंचमीचा रंगगाडा उत्सव आज साजरा होईल. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा उत्सव साजरा झालेला नव्हता. यंदा मोठ्या उत्साहात लोधी समाज हा उत्सव साजरा करणार आहे. पारंपारिक पद्धतीने शंभर बैलगाड्यांवर रंगाचे आणि पाण्याचे बॅरल ठेवण्यात येतात. शहरातील विविध भागातून या बैलगाड्यांची मिरवणूक निघते. दुपारी 4 वाजता बालाजी मंदिर येथून या रंगगाड्या निघतील.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. याबरोबरच माकपच्या वतीने आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च निघणार आहे. आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून दुपारी मार्चला सुरुवात होऊन नाशिक शहरात मुक्काम करणार आहेत. 


देशभरात रंगपंचमीचा उत्साह 


देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.  


कोरोना निर्बंधमुक्तीनंतर आज नाशिकमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. रहाडिंमध्ये उडी घेत रंग खेळण्याची नाशिकची अनोखी परंपरा आहे. 


साईंच्या शिर्डीत रंगपंचमी उत्सवाची धूम असमार आहे. देशभरातून साईभक्त करतात रंगांची उधळण करतील. संध्याकाळी 5 वाजता सुवर्ण रथाची मिरवणूक निघते. 


सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा 'हुडोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते. हा हुडा सागवानी लाकडाचा बनविण्यात आला आहे. घोडेमोडणी आणि वाघाची शिकार हे या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. कोलगांव, कुणकेरी, आंबेगावचं रोंबाट होळीच्या सातव्या दिवशी श्रीदेवी भावई, आवेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगांवचा श्रीदेव कलेश्वर हुडोत्सवात सहभागी होतात. तर तीन अवसार या हुड्यावर चढतात, यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारावर दगड मारण्याची प्रथा आहे.


नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च


माकपच्या वतीने आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई विधानभवन असा शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च निघणार आहे. आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून दुपारी मार्चला सुरुवात होऊन नाशिक शहरात मुक्काम करणार आहेत. त्यानंतर सोमवारी सकाळी हा मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. अंदाजे 15 हजार शेतकरी यामध्ये सहभागी होतील असा अंदाज. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत किमान आधार भाव दोन हजार रूपये निश्चित करून लाल कांद्याला 500 ते 600 रूपये अनुदान जाहिर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करावे अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.