बीड : गेल्या 2 महिन्यांपासून बीडमधील (Beed) सामाजिक व राजकीय वातावरण खराब झाले असून सातत्याने पोलीस तक्रारी व गुन्हा दाखल झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी आवाज उठवत आरोपींच्या अटकेसाठी विविध जिल्ह्यात मोर्चे काढले. तसेच, आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यत आपण या लढाईत देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले. दरम्यान, खंडणी आणि हत्याप्रकरणातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) जवळील असल्याचा आरोप करत मंत्री मुंडे यांचा राजीनामा देखील मागितला जात आहे. तर, अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंटही वाचायला मिळत आहेत. मात्र, आमदार सुरेश धस व मंत्री मुंडे यांच्या भेटीनंतर पुन्हा जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून आता धनंजय मुंडेंच्या मातोश्रींबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईंबाबत सोशल माध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याची घटना उघडकीस येताच धनंजय मुंडेंच्या चुलत भावाने सायबर सेलमध्ये याबाबत तक्रार दिली आहे. सोशल मीडियावर मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंत्री मुंडे यांच्या चुलत भावाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या आई रुख्मिणबाई पंडितराव मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मंत्री मुंडे यांचे चुलत बंधू तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत त्यांनी तक्रार दिल्यानंतर सायबर पोलिसांत अज्ञात युट्यूब धारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आक्षेपार्ह टिप्पणीबाबतची माहिती अजय मुंडे यांनी सायबर पोलिसांना दिली असून त्याबाबतचे पुरावेही दिले गेले आहेत. याप्रकरणी बीडचे सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
धस-मुंडे भेटीनंतर वातावरण तापलं
दरम्यान, गेल्या 2 दिवसांपासून मंत्री मुंडे आणि आमदार धस यांची भेट झाल्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांनी दगाफटका केल्याचं म्हटलं आहे. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही धस यांना लक्ष्य केलं. मात्र, या भेटीबाबत आमदार धस यांनी स्पष्टीकरण देताना आपण केवळ धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे म्हटले आहे.