Maharashtra News Live Updates 31th May 2023 : कर्नाटकात शाळांना सुरुवात, आरती आणि पुष्पवृष्टी करुन विद्यार्थ्यांचे स्वागत
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Karnataka : पिण्याच्या पाण्याची उत्तर कर्नाटकात टंचाई जाणवत असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राकडे पाच टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. बेळगाव , कलबुर्गी आणि उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने लोकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कृष्णा आणि भीमा नदीत पाच टीएमसी पाणी सोडावे अशी विनंती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कर्नाटकात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजला होता. विद्यार्थीही उत्साहाने पहिल्या दिवशी गणवेश परिधान करून शाळेत दाखल झाले होते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. शाळेत रांगोळ्या काढून वर्गाना तोरण बांधण्यात आले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरती करण्यात आली. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्याला गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आगमन होताच शिक्षकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिठाई देखील वाटण्यात आली.
Mumbai News: प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर उंदिर मारण्याचं औषध प्राशन करुन महिलेनं आपलं जीवन संपवलं, सायन रुग्णालयात 21 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर बीकेसी पोलिसांनी प्रियकर अमान अन्सारी (वय 21) आणि त्याची बहीण तरन्नुम अन्सारीला (वय 27) हिला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये दोघांच्या त्रासाला कंटाळून जीव देत आल्याचं महिलेने नमूद केलं होतं. दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Thane Water Cut: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा ,मानपाडा ,कोलशेत तसेच किसन नगर,वागळे इस्टेट या भागांत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणाची सध्याची साठवण क्षमता लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाण्याच्या नियोजनाकरीता दिलेल्या येत्या शुक्रवारी (2 जून) दुपारी 12 ते शनिवार (3 जून) दुपारी 12 पर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
Ahilyadevi Holkar : अहमदनगरच्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती साजरी करण्यास सुरवात झाली आहे.. या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह श्रीमंत राजे होळकर तृतीय हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील चौंडी येथे उपस्थित राहून आज सकाळी अभिषेक आणि महापूजा करुन जयंती साजरी करण्यात आली आहे.
Akole Nilvande Dam : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रोजी कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे.
उत्तर अहमदनगर जिल्हयातील 182 गावांना वरदान ठरणा-या निळवंडे धरणाच्या कालव्यांना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यास सुरूवात होणार आहे. निळवंडे कॅनॉलच्या पाण्याने साई समाधीला जलाभिषेक करणार असुन १८२ गावातील शंकराच्या मंदिरात देखील तेथील शेतकरी जलाभिषेक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर मुहूर्त मिळाला आहे.. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, 5 जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल, अशी खात्रीशीर माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी आणि खेड येथे थांबे देण्यात आले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
केंद्र सरकारकडून 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालयांवर टांगती तलवार
Recognition of 40 Medical Colleges Canceled: मोदी सरकारनं (Modi Government) देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. यासोबतच केंद्र सरकारनं (Central Government) 150 वैद्यकीय महाविद्यालयं निगराणीखाली ठेवली आहेत, याचाच अर्थ असा की, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यानं सरकारनं ही पावलं उचलली आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या महाविद्यालयांची मान्यता रद्द?
केंद्र सरकारनं ज्या 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द केली. ती गुजरात, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील आहेत. तसेच, उर्वरित दीडशे वैद्यकीय महाविद्यालयांची चौकशी अजुनही सुरूच आहे. चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांची मान्यताही रद्द करण्यात येईल, असं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Buldhana News : लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू, सजनपुरी परिसरात तणाव, दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Buldhana News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा (Autorickshaw) घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. या घटनेनंतर सजनपुरी (Sajanpuri) परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. परिणामी परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
नेमकं काय घडलं?
खामगावातील सजनपुरी परिसरात मंगळवारी (30 मे) रात्रीच्या लग्न सोहळा पार पडत होता. रात्री नऊच्या सुमारास लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसली. या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्रथम उपचार केले. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्याला अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रुग्णालयात नेत असतानाच रामू सावरकर या इसमाचा वाटेत मृत्यू झाला. यामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता.
परिसरात दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ऑटोरिक्षा चालक विशिष्ट समाजाचा असल्याने आणि जखमी वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -