नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin yojana) मोठा परिणाम दिसून आला. राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला तब्बल 237 जागांवर विजय मिळाला. तर, महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या. या विजयानंतर महायुतीमधील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेला याचं श्रेय दिलं. तसेच, लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचंही म्हटलं. विशेष म्हणजे महायुतीच्या जाहीरनाम्यातून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील हा निकाल व योजना देशभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळेच, आता दिल्लीतील (Delhi) विधानसभा निवडणुकांमध्येही लाडकी बहीण योजनेची चलती पाहायला मिळत आहे. भाजप आणि आम आदमी (AAP) पक्षामध्ये या योजनेवरुन महिलांना आकर्षित करण्याची स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. 


दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने महिला सन्मान योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली असून राज्यातील सर्वच महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याचं काम सुरू केलं आहे. त्यासाठी नोंदणी प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे. केजरीवाल यांनी महाराष्ट्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या योजनेचा मोठा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजप नेत्यानेही खासगी पद्धतीने स्वयंसेवी संस्थेच्या नावाने लाडली बहना योजना सुरू केली आहे. भाजप नेते व माजी खासदार परवेश वर्मा यांनी चक्क महिलांना त्यांच्या घरी बोलवून 1100 रुपयांचे पाकीट व कार्ड वाटप केले. या 1100 रुपयांसह येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे, निवडून देण्याचं आवाहन केले. तसेच, भाजपची सत्ता आल्यास 2500 रुपये दरमहा देण्यात येतील, असेही सांगण्यात आले. या घटनेवरुन दिल्लीतील आप आणि भाजपात वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही या घटनेवरुन भाजपला लक्ष्य केलं. तसेच, निवडणूक आयोगाने परवेश वर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ईडी आणि सीबीआयने वर्मा यांच्याकडे असलेल्या पैशाची तपासणी करावी, असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही लाडकी बहीण योजनेचा फिव्हर पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, आम आदमी पक्षाकडून महिला सन्मान योजनेसाठी नोंदणी करुन घेतली जात आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही नोंदणी केली जात असताना पुढील निवडणुकीत झाडूला मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. तुम्हाला दरमहा 2100 रुपये पाहिजे असतील तर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला, म्हणजेच झाडूला मतदान करुन निवडणुकीत विजयी करा, असे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओही आम आदमी पक्षाकडूनच शेअर केला जात आहे. त्यामुळे, दिल्लीत लाडक्या बहिणींना आकर्षित करण्याची स्पर्धाच सुरू झाल्याचे दिसून येते. आता, निवडणूक आयोग याकडे कसे पाहते, तसेच या योजनांवरील वादावर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 






हेही वाचा


कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका