(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Corona : कोल्हापूर लेवल 4 मध्ये, निर्बंध शिथिल करणार नाही : अजित पवार
कोल्हापूर जिल्हा हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत. उलट गरज पडल्यास नियम अधिक कडक केले जातील, असं अजित पवार म्हणाले.कोरोनाला आळा घालण्यासाठी गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत. उलट गरज पडल्यास नियम अधिक कडक केले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावळी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे, मात्र कोल्हापुरात वातावरण अजूनही तसंच आहे. पहिल्या लाटेत कोल्हापुरात कोरोना आटोक्यात आणला होता. परंतु कोल्हापुरात कोविड पॉझिटिव्हिटीचा रेट सर्वाधिक आहे. सध्या हा जिल्हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत. उलट नियम अधिक कडक केले जातील. कोल्हापूरकरांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. नागरिक अजूनही मास्क वापरत नसल्याचं समोर येत आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवार यांनी केलेल्या सूचना
कोल्हापुरातील चाचणीचं प्रमाण दीडपट, दुपटीने वाढवा. आरोग्य विभाग आणि अन्य दोन विभागात कर्मचारी भरती करा. खासगी रुग्णालयांनी नियमाप्रमाणे बिलं लावावीत, अशा सूचना केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. दुर्गम भागातील माय लॅब अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देणार आहोत. 5 जुलैपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसह इतरांचं प्रलंबित वेतन हे पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करुन घेणार आहोत, असं आश्वासन अजित पवार यांनी दिली.
लवकरच अधिकचा लसीचा साठा उपलब्ध होण्याचा अंदाज : अजित पवार
लस उपलब्ध होईल तेव्हा लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. सध्या आहे त्याच केंद्रांवरुन लसीकरण केलं जाईल. 15 जूननंतर किंवा 1 जुलैपासून लसीचा अधिकचा साठा उपलब्ध होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रे वाढवली जातील. प्रत्येक तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचं लसीकरण योग्य पद्धतीने होईल, असं अजित पवार म्हणाले.
"आरोग्य, वैद्यकीय, महसूल, ग्रामविकास विभागांच्या कामांमध्ये एकी दिसली तर उत्तम काम होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.