Kirit Somaiya: किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता
किरीट सोमय्या मुरूडला रिसॉर्टवर जाणार या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
Kirit Somaiya: परिवहन मंत्री अनिल परबांचा दापोलीतील रिसॉर्ट तोडणारच असा चंग बाधून भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाले. त्यानंतर किरीट सोमय्यांनी पोलिसांशी चर्चा केली. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमय्यांना नोटीस बजावली आहे. मात्र किरीट सोमय्या मुरूडला रिसॉर्टवर जाणार या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
परबांचं रिसॉर्ट गाठण्यापूर्वीच पोलीस सोमय्यांना अडवण्यात आले. सोमय्यांचा ताफा पोलिसांनी नोटीस देण्यासाठी कशेडी घाटात अडवला आणि त्यामुळे कशेडी घाटात सर्वसामान्यांची मात्र अडचण झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटं चालेल्या या सगळ्या ड्रामामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यानं हा ड्रामा झाल्यानंतर त्यांचा ताफा न थांबता निघून गेला.
सकाळी सातच्या सुमारास भलामोठा प्रतिकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या मुंबईतून रवाना झाले. परिवहनमंत्री अनिल परब यांचे दापोलीमधील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सोमय्यांना रोखण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्यात.. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.