Abdul Sattar: अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस, राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर यांची घोषणा
NCP On Abdul Sattar: सत्तार आणि राष्ट्रवादीमधील वाद आणखीनच वाढतांना दिसतोय.
NCP On Abdul Sattar: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी अनुद्गार काढणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा असे आवाहन करत, कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केली आहे. जालना येथील राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी ही घोषणा केलीय.
शिंदे गटावर 'पन्नास खोके' असा सतत होत असलेल्या आरोपाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका केली होती. सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर आंदोलन करत त्यांच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली. त्यातच आता जालना येथील राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्तार आणि राष्ट्रवादीमधील वाद आणखीनच वाढतांना पाहायला मिळतोय.
काय म्हणाल्यात रेखा तौर....
यावर बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर म्हणाल्यात की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा निषेध केला पाहिजे. फक्त सुप्रिया सुळे यांचाच नाही तर राज्यातील सर्वच महिलांचा सत्तार यांनी अपमान केला आहे. सुप्रिया सुळे या अब्दुल सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. तर अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथे दौऱ्यावर असतील तेथील तिथे त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडावे आणि कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस माझ्याकडून देण्यात येईल असे रेखा तौर म्हणाल्यात.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया...
या सर्व प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने जे गलिच्छ विधान केले त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटली यात काही आश्चर्य नाही. याप्रकारच्या भूमिकेचे समर्थन होत नसलं तरी याची जाण सगळ्यांनाच असते असे नाही. पण ज्यांना जाण आहे अशा त्यांच्या प्रमुखाने त्या व्यक्तीला माफी मागण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने माफी मागितल्याची भूमिका घेतल्याचे दिसते. आता याच्या खोलात जायची आवश्यकता नाही. जे काही घडलं ते महाराष्ट्राला अजिबात पसंत नव्हतं. हे ठिकठिकाणच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झालेलं दिसतं. मला असे वाटते की कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल व त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत असेल तर त्याची नोंद करून आपण याकडे अधिक लक्ष देण्याची गरज नाही. जे काही घडलं ते घृणास्पद होतं. मात्र त्यावर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचा सुसंस्कृत चेहरा स्पष्ट करणारी होती. माझे सर्वांना असे विनम्र आवाहन आहे की आपण सर्वजण आता याविषयी जास्त प्रतिक्रिया देऊ नयेत, असे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.