Jalgaon News : शेतकऱ्यांनो फळपिकांची लागवड करताय! डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्या!
Jalgaon News : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
Jalgaon News : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून शेती उभी करणे सोपे जाते. त्याचबरोबर अनेक शेतकरी कर्ज काढून शेती विकसित करत असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
जळगाव जिल्हा (Jalgaon District) केळी आणि कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. मात्र यंदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळविला आहे. कर्ज काढून उभ्या केलेल्या शेतीला कवडीमोल भाव मिळत असल्याने कर्जाचा डोंगर उभार राहिला आहे. मात्र यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाची डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजना महत्वपूर्ण ठरत आहे. दरम्यान खरीप आणि रबीसाठी जिल्हा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने (Jalgaon District Bank) निश्चित केले आहे. केळीसाठी हेक्टरी 95 हजार, तर बागायती कापसासाठी 46 हजार रुपये कर्ज वितरीत केले जाणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात झाली असून, या वर्षात शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज मिळणार आहे.
पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिले. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादित विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास एक टक्का व्याजदरासह आणखी दोन टक्के व्याजदर सवलत देण्यात येत होता, मात्र केंद्र सरकारने परिपत्रक काढल्याने यावर कोणताही निर्णय अजून तरी बँकेने घेतलेला नाही.
यंदा 900 कोटींचे उद्दिष्ट
यंदा आतापर्यंत 90 हजार शेतकऱ्यांना 450 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहे. जून अखेरपर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 900 कोटी पर्यंत कर्जवाटप केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. जिल्हा बँकेने गेल्यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना 800 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले होते. जिल्हाधिऱ्यांकडून कर्जवाटपाचा इष्टांक ठरवून दिलेला असतो. प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त कर्ज वाटप होते. केळी व कापूस ही दोन पीकं मुख्य जळगाव जिल्ह्यात घेतले जातात. केळीला हेक्टरी 95 हजार तर कापसाला 46 हजार रुपये कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला असून त्याची अमंलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच भाजीपाला, फळ व फूल पिकांसाठी कर्जाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यातील कापूस या दोन पिकासाठी शेतकऱ्यांकडून कर्ज घेतले जाते. भाजीपाला व फळ पिकांसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे.
काय आहे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना?
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनमध्ये विहित मुदती अल्प मुदत पीककर्जाची परतेफड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदतीत पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये कर्ज मर्यादिपर्यंत तीन टक्के व्याज सवलत, एक लाख ते 3 लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्का सवलत देण्यात येत होती. आता एक लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक 2 टक्के व्याजदरात सवलत देण्यात येते.