Maharashtra Rains : कोल्हापूर, मावळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी ; राज्यातील काही भागांत गारवा
Maharashtra Rains : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
Maharashtra Rains : कोरोनाचं संकट राज्य सरकारच्या नाकी नऊ आणत असतानाच राज्यावर आता अवकाळी पावसाचं संकट ओढावलं आहे. रविवारी वाशिम, मावळ आणि कोल्हापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
पुण्याच्या मावळ तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. मावळ तालुका हा पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. त्यातच रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे या गारपीटीचा पर्यटकांनी आनंद घेतला. मागील कित्येक दिवस नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत, या गारपिटीने मात्र ते सुखावले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस
कोल्हापूरातील गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अचानकच झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण. या भागात गारपीटीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
अवकाळी पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार असल्याची चिन्हं आहेत. याशिवाय अनेक गावातल्या आठवडी बाजारांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. फक्त कोल्हापूर, मावळच नव्हे तर वाशिममध्येही जिल्ह्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढत असल्याची चिन्हं होती. त्यातच आता अवकाळी पावसामुळं हवेत तात्पुरता गारवा आला आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांचा आरोग्यावरही थेट परिणाम होणार आहे. त्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :