Urban Pod Hotel : भारतीय रेल्वेचे पहिले 'पॉड हॉटेल' मुंबई सेंट्रल स्थानकात सुरू
भारतातील पहिले रेल्वे स्थानकातले पॉड हॉटेल पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आले आह. ज्याचे नाव आहे अर्बन पॉड हॉटेल
मुंबई : जगातील विविध देशांत प्रमाणे आता भारतात देखील रेल्वे स्थानकांमध्ये पॉड हॉटेल ची संकल्पना राबविण्यात येत आहे. भारतातील पहिले रेल्वे स्थानकातले पॉड हॉटेल पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आले आहे. ज्याचे नाव आहे अर्बन पॉड हॉटेल. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या नवीन हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. आय आर सी टी सी तर्फे कंत्राटी पद्धतीवर या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. जर मुंबई सेंट्रल येथे असलेल्या पॉड हॉटेलला प्रवाशांनी पसंती दिली तर येणाऱ्या काळात विविध मोठ्या स्थानकांवर अशी हॉटेल्स निर्माण करण्यात येतील.
पॉड हॉटेल ही संकल्पना आतापर्यंत आपण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये पाहिली होती. या संकल्पनेचा उदय जपान या देशात झाला होता. सध्या जगातील अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स अशा सर्व मोठ्या देशांमध्ये पॉड हॉटेल्स आढळतात. त्याच धर्तीवर मुंबई सेंट्रल मधील हॉटेल तयार करण्यात आले आहे. पॉड हॉटेल म्हणजे ज्या प्रवाशांना काही तासांसाठी एखाद्या स्टेशनवर थांबायचे आहे, मात्र हॉटेलची सुविधा परवडत नसेल किंवा उपलब्ध नसेल अशा प्रवाशांसाठी पॉड हॉटेल अतिशय उपयुक्त ठरतात. एका छोट्या कुपी किंवा कॅप्सूल प्रमाणे आपल्याला बसण्यासाठी, झोपण्यासाठी नाहीतर आराम करण्यासाठी हे पॉड असतात. व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यासाठी, शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी, सोलो ट्रिप किंवा बॅकपॅकर्स लोकांसाठी हे पॉड हॉटेल्स बेस्ट ऑप्शन असू शकतात. यासोबतच कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपसाठी देखील पॉड हॉटेल्स आहेत.
मुंबई सेंट्रल येथे असलेल्या अर्बनपॉड या हॉटेलमध्ये विविध प्रकारचे पॉडस उपलब्ध आहेत. एक आहे क्लासिक पॉड. यामध्ये बाजूबाजूला पॉड देण्यात आले आहेत. दुसरे आहे फॅमिली पॉड. ज्यात एकाच खोलीत समोरासमोर आणि वर खाली असलेले चार पॉड उपलब्ध आहेत. तिसरे आहे महिलांसाठी आरक्षित पॉड. ज्यात फक्त महिलांसाठी आरक्षित असलेले क्लासिक पॉड देण्यात आले आहेत. तर दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा असलेला एक पॉड देखील या हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. ज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शौचालय देखील आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात पहिल्या मजल्यावर तीन हजार चौरस फुटांवर हे हॉटेल उभारण्यात आले आहे. यामध्ये 48 पॉडस आहेत.
हे पॉड हॉटेल कॉम्पॅक्ट आहेत, त्यांची डिझाइन आरामदायी आहे, तसेच यात आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. पॉड रूममधील प्रवाश्यांना लगेज रूम, टॉयलेटरीज, शॉवर रूम, वॉशरूम सर्वांसाठी एकाच ठिकाणी सामायिक आहे. तर प्रत्येक पॉड रूम मध्ये प्रवाशांना टीव्ही, छोटे लॉकर्स, आरसे, एडजस्टेबल एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर, रीडिंग लाइट्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. सोबत अंतर्गत दिवे, मोबाईल चार्जिंग, स्मोक डिटेक्टर, डीएनडी इंडिकेटरची सोय देखील आहे.
या पॉड हॉटेलसाठी पैसे देखील मोजावे लागणार आहेत. क्लासिक पॉडसाठी 12 तासांसाठी 999 रुपये प्रति व्यक्ती ते 24 तासांसाठी 1999 रुपये प्रति व्यक्ती असे दर आहेत. तर प्रायव्हेट पॉडसाठी 12 तासांना 1249 रुपये तर 24 तासांना 2499 रुपये मोजवे लागतील. महत्त्वाचे म्हणजे या हॉटेल मध्ये चप्पल, शूज घालून जाता येणार नाही तसेच, जेवण देखील बाहेरून खाऊन यावे लागणार आहे.