Heat Wave : वर्ध्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, 45 अंश तापमानाची नोंद
राज्यामध्ये (Maharashtra) येत्या पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिले आहे.
मुंबई : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा (Heat Wave) कहर सुरु आहे. मार्च महिन्यात दोन वेळा उष्णतेची लाट आली. पण एप्रिल महिन्यातही नागरिकांची उन्हापासून सुटका होणार नाही असे चित्र दिसत आहे. विदर्भातील सर्वात जास्त तापमान आज वर्ध्यात नोंदवलं गेलं आहे. आज 45℃ इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र गेल्या दोन दिवसात ही लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्याचं टाळले. पुढचे पाच दिवस राज्यात उष्णतेच्या झळा, पाऊस आणि उकाडा आणखी वाढणार आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र या आठवड्यात लाट तीव्र झाल्याने अनेकांनी दुपारच्या वेळात घरा बाहेर पडण्याचं टाळले. एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या नागरिकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे ते नागरिक उन्हापासून बचाव करणाऱ्या उपाययोजना करून बाहेर पडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी काहींनी शीतपेय तर काहींनी उसाचा रस पिण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे.
'या' ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा
अकोला आणि बुलडाणा येथे मंगळवारी ते गुरूवारी या काळात उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्णता वाढू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पाऊस पडू शकतो. सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार या दरम्यान पाऊस पडू शकतो. कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच बीड-परभणीमध्ये गुरुवारी पाऊस पडू शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग जास्त असू शकतो.
संबंधित बातम्या :