आमदार गोपीचंद पडळकर यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) मागील आठवड्यात गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात राडा झाला होता.
सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून गेल्या आठवड्यात आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे आता आमदार पडळकर यांना अटक होणार की पडळकर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार हे पाहावे लागणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांचाही जामीन अर्ज फेटाळला गेला आहे.
आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर मागील आठवड्यात गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात राडा झाला होता. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला होता. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला होता. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून हा वाद सुरू झाला होता आणि त्याचें पर्यवसन शिवीगाळपर्यंत गेले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी पाटील यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांनी आमदार पडळकर आणि पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला.
या वादातून आमदार पडळकरांनी गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद जानकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याची फिर्याद आमदार पडळकर यांनी दाखल केली आहे. त्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यातून पोलिसांनी दोन्ही गटाच्या दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळावा, यासाठी आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आटपाडीतील राजकीय राड्याप्रकरणी पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासह तानाजी पाटील आणि राजू जानकर यांच्या चार अलिशान कार जप्त केल्या आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :