(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा, चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना उत्तर
अमोल मिटकरी यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती की, आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये. याला आज चित्रा वाघ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
मुंबई : अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. अमोल मिटकरीला काय माहिती आहे. नवीन आमदार झालाय चांगलं काम कर. बाकी माझं आणि साहेबांचं नातं काय हे माझ्या बापाला जाऊन विचार भावा, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर दिलंय.
आज चित्रा वाघ यांनी आयपीसी सेक्शन 67 अंतर्गत बिकेसी येथील सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये येऊन गुन्हा दाखल केला. यावेळी माध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती की, आपण साहेबांच्या तालमीत तयार झाला आहात त्यामुळे दिशाभूल करू नये. याला आज चित्रा वाघ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं.
दरम्यान चित्रा वाघ यांचे काही दिवसांपूर्वी काही मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाले होते. शिवाय धमक्या देणारे फोन देखील आले होते. याविरोधात त्यांनी आज गुन्हा दाखल केला. या प्रकरणाबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, आज सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाईला काय केल्यावर ती शांत बसेल तर तिचे खासगी फोटो, पतीसोबतचे फोटो व्हायरल करायचे. हे कशासाठी तर बलात्काऱ्याला वाचवायला? संजय राठोडशी याचा थेट संबंध आहे म्हणून त्याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही लढाई लढतोय. राजीनामा ही तर खरी सुरुवात आहे पूजाच्या न्यायासाठी. माझ्यासोबत जे केलं हे तर ट्रेलर आहे. मला याचा काही फरक पडत नाही. जिजाऊंनी शिकवण दिलेली विसरलात का घरावर हल्ला करताय.
दरम्यान सचिन सावंत म्हणाले होते की, किशोर वाघ यांच्याविरोधात कारवाई फडणवीस सरकारनेच केली होती. या प्रश्नाला उत्तर देताना वाघ म्हणाल्या, आमच्याकडे केस स्टँड आहे. मुख्य आरोपी आमच्या शेजारीच राहतो. त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. त्याचा तपास देखील होत नाही. माझा नवरा तिथं पैसे घ्यायला होता का? पंचनाम्यामध्ये त्याच नाव देखील नाही. तरीदेखील माझ्या नवऱ्यावर का गुन्हा दाखल केला हा साधा प्रश्न आहे? एसीबीकडे 2011 पासून केसेस पेंडिंग आहेत. याची दखल त्यांना घेऊ वाटत नाही परंतु चित्रा वाघच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल होतो. परंतु मुख्य आरोपीवर नाही. मला गृहमंत्री, एसीबीचे डिजी यांनी उत्तर द्यावं मुख्य आरोपीवर काय कारवाई केली? मी गुन्ह्यांना घाबरत नाही. तुम्हांला काय करायचं ते करा. यानंतर चित्रा वाघ यांना तुमच्या विरोधात आणि दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांविरोधात वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात बंजारा समाज आणि पूजा चव्हाणची बदनामी केल्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे असा प्रश्न विचारण्यात आला.
याला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, माझ्याकडे शेकडो मेसेज आहेत. ज्यामध्ये बंजारा समाजातील अनेकांनी पाठींबा दिल्याचे मेसेज आहेत. विविध संघटना सोबत आहेत. राजीनामा झाला म्हणजे लढाई जिंकलो नाही ही तर सुरुवात आहे. पूजाला न्याय मिळाल्याशिवाय शांत राहणार नाही. एक माणूस म्हणजे समाज नव्हे.