छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून G-20 महिलांची परिषद; 15 देशांच्या महिला प्रतिनिधींची उपस्थिती
Chhatrapati Sambhajinagar: महिलांच्या नेतृत्वात देशांचा विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी प्रमुख सहा मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar G-20 Conference: भारतासाठी अभिमानाची बाब ठरत असलेल्या G-20 परिषदेला (G-20 Conference) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात आजपासून सुरुवात होत आहे. जी-20 राष्ट्रसमूहाच्या वूमन-20 परिषदेला आजपासून सुरुवात होत असून, सकाळी 09.30 वाजल्यापासून हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी 19 पैकी 15 देशांच्या महिला प्रतिनिधींचे कालपर्यंत आगमन झाले होते. महिलांच्या नेतृत्वात देशांचा विकास आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण यासाठी प्रमुख 6 मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे.
विविध विषयांवर चर्चासत्र
सुरुवातीच्या या बैठकीत विविध विषयांवर आयोजित पॅनल चर्चासत्रांमध्ये सहभागी सदस्य आपले विचार मांडतील. नॅनो, मायक्रो आणि स्टार्ट अप उद्योगांमधील महिलांचे सक्षमीकरण, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या कृतीसाठी बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका, तळागाळामधील महिला नेतृत्वासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करणे, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासाद्वारे डिजिटल क्षेत्रातील लिंगाधारित विभाजन दूर करणे, शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकतेसाठी मार्ग तयार करणे आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास, या विषयांचा यात समावेश असेल.
वुमन-20 च्या उद्घाटनपर बैठकीला महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, स्मृती झुबिन इराणी उपस्थित राहणार असून, उपस्थित मान्यवरांसमोर त्या लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडतील. भारत सरकारचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित राहतील. त्याशिवाय, या बैठकीला भारताचे G-20 शेर्पा अमिताभ कांत, वुमन-20 चे संस्थापक अध्यक्ष डॉ. गुल्डन तुर्कतान आणि वुमन-20 इंडोनेशिया 2022 च्या अध्यक्ष उली सिलाही या बैठकीला उपस्थित राहतील.
'या' पाहुण्यांचे आगमन!
छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत आगमन झालेल्या पाहुण्यांमध्ये एंजेला जू-ह्यून कांग, डॉ.संध्या पुरेचा, बन्सुरी स्वराज, डॉ.शमिका रवी, रविना टंडन, भारती घोष, केसेनिया शेवत्सोवा, एलेना म्याकोटनिकोवा, केल्सी हॅरिस, समंथा जेन हंग, प्रभिओत खान, आयेशा अख्तर, कार्लो सोल्डातिनी, उंडा लॉरा सब्बादिनी, जिओव्हाना आयेलिस, मार्टिना रोगाटो, स्टेफानो डी ट्रेलिया, एल्विरा मारास्को, व्हेनेसा डी अलेस्सांद्रे, अँड्रिया ग्रोबोकोपटेल, सिल्व्हिया तारोझी, निकोलस बोरोव्स्की, कॅथरीना मिलर, हदरियानी उली तिरु इडा सी, येणें क्रिसंती, इस्तियानी सुरोनो, श्री वुर्यानिंगसिह, तंत्री किरणदेवी, हरियाणा हुताबरात, जॉइस फ्रान्सिस्का कार्ला यास्मिन, डेनाटालाइट क्रिस्डेमेरिया, फराहदिभा तेन्रीलेंबा, गुल्डन तुर्कन, यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांना पोलिसांचा दणका; 60 जणांविरोधात गुन्हा दाखल, न्यायालयात खटलाही चालवणार