Aurangabad: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला अखेर 15 अटी शर्तींसह पोलिसांची परवानगी
उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्यासाठी तब्बल एक महिन्याचा कालावधी लागला.
Uddhav Thackeray Meeting Police Permission Granted: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 8 जूनला औरंगाबाद शहरात जाहीर सभा होणार आहे. परंतु सभेला कालपर्यंत परवानगी मिळाली नव्हती. मात्र आज उद्धव ठाकरेंच्या या सभेला परवानगी मिळाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या या सभेला पोलिसांनी 15 अटीशर्तींसह परवागनी दिली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादेत 8 जून 1985 रोजी स्थापन झाली. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र सभेला चार दिवस शिल्लक राहिले असताना पोलिसांची परवानगी मिळाली नसल्याचे मोठी चर्चा होत होती. याबाबत एबीपी माझाने गुरुवारी बातमी दाखवली होती. दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांनी आज या सभेला परवानगी दिली आहे. सोबतच 15 अटी शर्तींही घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेत या 15 अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो.
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी ‘या’ अटी-शर्थी खालीलप्रमाणे
-जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजीत करावी.कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
-कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येवू नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
-सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येतांना व परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
-सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
- कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
-सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
-सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण व नियमन ) प्रमाणे आवजाची मर्यादा असावी
-कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील,यासह एकूण 15 अटीशर्तींसह सभेला परवागनी देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांचे भाषण याच मैदानावर
गेल्या महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची विराट सभा याच मैदानावर झाली होती. त्यांनी त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता. आता उद्धव ठाकरे सुद्धा त्याच मैदानावर सभा घेणार आहे. राज यांच्या टीकेला तसेच भाजपकडून करण्यात येणाऱ्या टीकेला आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.