Haribhau Bagade: भाजप आमदार हरिभाऊ बागडेंच्या मागणीला यश, 22 कोटींच्या मुरूम चोरीची अखेर चौकशी सुरू
Aurangabad: जालन्याचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीने घटनास्थळाची नुकतीच पाहणी देखील केली आहे.
Haribhau Bagade: औरंगाबादच्या (Aurangabad) हर्सूल सावंगी येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम, दगड, माती या गौण खनिजाचा महामार्गासाठी चोरून वापर केल्याचा आरोप भाजपचे आमदार, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी केला होता. तर या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बागडे यांनी अधिवेशनात केली होती. त्यांच्या याच मागणीला अखेर यश आले असून, देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील 22 कोटींच्या मुरूम चोरीची अखेर चौकशी सुरू झाली आहे. तर यासाठी जालन्याचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या चौकशी समितीने घटनास्थळाची नुकतीच पाहणी देखील केली आहे.
बागडे यांच्या आरोपांनुसार, औरंगाबादच्या हर्सूल सावंगी येथे देवगिरी सहकारी साखर कारखान्याने गट नबर 41,43.44,46,47 आणि 54 जमीन घेतली होती. कारखान्याने घेतलेली जमीन सर्व मिळून जवळपास 54 हेक्टर होती. मात्र यातील 20 एकर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली होती. मात्र समृद्धी महामार्गासाठी दिलेल्या 20 एकर सोडून, उर्वरित जमिनीवरून देखील गौण खनिजाचा वापर करण्यात आला. त्याचा समृद्धी महामार्गासाठी वापर झाला की आणखी कुठे नेण्यात आला याबाबत कोणतेही माहिती नसल्याचा आरोप बागडे यांनी केला होता. तर हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती.
समितीकडून चौकशी सुरु
बागडे यांच्या मागणीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे जालना येतील अपर जिल्हाधिकारी अकुंश पिनाटे हे चौकशी करत असून, पथकाने दोन दिवसांपूर्वी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा गौण खनिज शाखा विभागाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. त्यामुळे नियुक्त करण्यात आलेल्या समितीने चौकशीला सुरुवात केली असून, लवकरच चौकशी अहवाल तयार करून तो विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
बागडेंनी केली होती स्वतः पाहणी...
हर्सूल सावंगी भागातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील कोट्यवधी रुपयांच्या मुरूम, दगड, माती या गौण खनिजाची चोरी चाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली होती. चोरी गेलेला मुरूम कोणी आणि कशासाठी चोरून नेला याबाबत अजूनही खुलास होऊ शकला नाही. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी चोरी गेलेल्या गौण खनिजाबाबत पदाधिकारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली होती.
संबंधित बातमी: