Chandrakant Khaire: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हिमालयात पाठवा; खैरेंची खोचक टीका
Aurangabad: चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
Aurangabad News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरात आंदोलने केले जात आहे. तर ठाकरे गटाकडून देखील मुंबईसह अनेक ठिकाणी आज देखील आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान औरंगाबादच्या क्रांती चौकात आज सकाळी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना हिमालयात पाठवा अशी खोचक टीका खैरे यांनी केली आहे.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, राज्यपालांना या पवित्र भूमीतून हाकलून दिले पाहिजे. त्यांना हिमालयात पाठवून दिले पाहिजे त्यांना परत ईकडे येऊ देऊ नका. कारण हे पार्सल हिमालयातून आले असून, त्यांना पुन्हा तिकडे पाठवून द्यायला हवे आहे. भारतीय जनता पार्टी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कसे सहन करत आहे. भाजपने मौन का धारण केले आहे. तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलत नाही,तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी खैरे यांनी दिला.
मोदींची दादागिरी संपवण्याची गरज
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येण्याच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत बोलतांना खैरे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रपणे येत भीम शक्ती आणि शिव शक्ती आणल्यास चांगलंच होईल. शिंदे-फडणवीस यांनी राज्यात ज्याप्रमाणे अराजकता आणली आहे तिला संपूर्णपणे संपवणे गरजेचे आहे. तर मोदींनी ज्याप्रमाणे देशात दादागिरी सुरु केली आहे, ती दादागिरी पूर्णपणे संपवण्यासाठी आज शिव शक्ती आणि भीम शक्तीची गरज आहे. याचा फायदा महाराष्ट्राला होईल. राज्यात अनेक असे मतदारसंघ आहे की, त्या ठिकाणी दोन्ही एकत्र आल्याने फायदा होणार आहे. तसेच यामुळे 38 ते 40 जागा आणखी वाढतील असेही खैरे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेकरांच्या बैठका झाल्यात...
मुंबई महानगरपालिकेत याचा प्रयोग केला जाणार असल्याची शक्यता असतानाच असाच, भीम शक्ती आणि शिव शक्तीचा प्रयोग औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत केला जाणार आहे का?, यावर देखील खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमध्ये प्रकाश आंबेडकर आमच्यासोबतच होते. महापौर निवडणुकीसह इतर निवडणुकीत ते आमच्यासोबतच होते. त्यांना काही पद देखील आम्ही दिले होते, असेही खैरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्या बैठका देखील झाल्या असल्याच्या वृत्ताला खैरे यांनी दुजोरा दिला.