Y Security: सत्तांतराच्या शंभर दिवसानंतरही बंडखोर आमदारांना 'वाय' दर्जेची सुरक्षा कायम; पैसा मात्र...
Y Security: दोन शिफ्टमध्ये 30 ते 32 अधिकारी-कर्मचारी या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत आहेत.
Aurangabad News: शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर राज्यात झालेल्या सत्तांतराला शंभर दिवस पूर्ण झाले आहे. दरम्यान या काळात शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणाने त्यांना वाय दर्जाची सुरक्षा (Y Category Security) आणि सोबतच एस्कॉर्ट (पायलट वाहन) देण्यात आले होते. मात्र ही सुरक्षा आता आणखी किती दिवस असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही गटांच्या आमदारांमध्ये हसत-खेळत गप्पा रंगतायात, एकाच विमानाने प्रवास केला जातोय. मग ही सुरक्षा अजून किती दिवस पुरवली जाणार आणि यावर होणारा खर्च याबाबतही विरोधकांकडून प्रश्न विचारला जातोय.
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर अनेक ठिकाणी शिवसेनेकडून रस्त्यावर उतरुन आंदोलने करण्यात आली. त्यामुळे शिंदे गटाच्या 31 बंडखोर आमदारांना वाय दर्जेची सुरक्षा देण्यात आली. वाय दर्जा आणि सोबतच एस्कॉर्ट अशी दोन शिफ्टमध्ये या आमदारांना सुरक्षा आहे. त्यामुळे मंत्रिपद नाही मिळाले तरीही वाय दर्जेच्या सुरक्षेमुळे या आमदारांना राज्यमंत्री पदाचा फील येत असल्याची चर्चा आहे. पण यामुळे सरकारच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भर पडतोय त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
वाय दर्जेची सुरक्षा म्हणजे काय....
वाय या श्रेणीच्या सुरक्षेत ज्यांना सुरक्षा दिली जाते, त्यांच्या घरी एक पीएसओ (विशेष सुरक्षा रक्षक) आणि तीन पोलीस कर्मचारी तैनात असतात. सोबतच एवढेच कर्मचारी त्यांच्या कार्यालयाबाहेर किंवा यापेक्षा अधिक गरजेनुसार सोबत तैनात असतात.एस स्कॉटमध्ये (पायलट वाहन) एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कर्मचारी असतात. याप्रमाणे दोन शिफ्टमध्ये 30 ते 32 अधिकारी-कर्मचारी या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत आहेत. त्यामुळे एका आमदाराच्या सुरक्षेचा सरासरी खर्च महिन्याकाठी 10 लाखांपेक्षा अधिक आहे. तर पोलिसांच्या तपास यंत्रणेवर तान पडतो तो वेगळा आहे.
हे कसले वाघ...
बंडखोर आमदारांना पुरवल्या जाणाऱ्या वाय दर्जेच्या सुरक्षेच्या मुद्यावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसनेचे आमदार स्वतःला वाघ म्हणतात, पण वाय दर्जेची सुरक्षा घेऊन फिरणारे हे कसले वाघ आहे. बंडखोरी केल्यावर हे आमदार म्हणाले की, आम्हाला कुणाचीच भीती नाही. मग सोबत सात-आठ पोलीस कर्मचार्यांना घेऊन का फिरतात. त्यांच्यावर आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जात आहे. त्यामुळे हे पैसे त्यांच्याकडून का वसूल केले जात नाही. त्यामुळे या वाघांची सुरक्षा तत्काळ काढून घेण्याची मागणी जलील यांनी केली आहे.
बंडखोर आमदार म्हणतात...
यावर औरंगाबादचे शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले, आमच्या काही आमदारांना सुरक्षा देण्यात आली आहे. सुरक्षा देऊन दोन-अडीच महिने झाले आहेत. त्यामुळे ही सुरक्षा कधी काढतील याबाबत सर्वांचाच विचार सुरु आहे. इतर लोकांचा सांगता येत नाही, पण माझी सुरक्षा काढून घेतली तरीही काहीही हरकत नसल्याचं जैस्वाल म्हणाले.