गुडघ्याभर पाण्यातून फिरणारे कृषिमंत्री म्हणतायत ओला दुष्काळाची परिस्थिती नाही; अंबादास दानवेंची टीका
Aurangabad: कृषिमंत्री सोडले तर राज्यातील एकही मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर जातांना पाहायला मिळत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
Rain News: औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान राज्यात अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. तर यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तार यांच्यावर टीका केली आहे. गुडघ्याभर पाण्यातून फिरणारे कृषिमंत्री म्हणतायत ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला. औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, गेल्या अडीच-तीन महिन्यापासून शेतात कंबरेइतकं पाणी तुंबलेल्या अवस्थेत आहे. आत्ताचे पीक तर गेलेच आहे, पण आता नव्याने पेरणी करणं देखील अवघड असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. मात्र स्वतः गुडघ्याभर पाण्यातून फिरणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणतायत ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला.
पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलय, कधी नव्हे तशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीय. मी काल पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात गेलो होतो, 175 टक्के पाऊस झालाय. जुलैमध्ये झालेल्या नुकसानीबाबत 3 हजार 400 कोटी रुपयांचे मदत जाहीर केली होती. मात्र ती मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलेली नाही. अशात मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, तशाच आत्महत्या राजभरात घडल्या आहेत. अशात कृषिमंत्री सोडले तर राज्यातील एकही मंत्री नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर जातांना पाहायला मिळत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
बळीराजाचा अजून किती अंत पाहणार?
तर अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत पुढे बोलतांना दानवे म्हणाले की, पहीले अतिवृष्टी, आता परतीचा पाऊसाने अक्षरशः थैमान घातलय, रोज बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा ऐकतोय, सरकारकडे मांडतोय. उत्तर काय तर फक्त घोषणा, आश्वासन मिळत आहे. सरकारच्या संवेदनाहीन होऊन काम करतय, दसरा गेला दिवाळी पण गेली बळीराजाचा अजून किती अंत पाहणार? ओल्या दुष्काळाची घोषणा करा, अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे.