(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हे जरा अतीच झालं! आधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसाठी अन् आता पालकमंत्र्याच्या फोटोसाठी 'आनंदाचा शिधा'ला उशीर?
Aurangabad: मंत्री भुमरे यांचा फोटो लावण्यासाठी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी चार दिवस उशिरा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Anandacha Shidha: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) अखेर अनेक ठिकाणी पोहचला आहे. मात्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण पैठण तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पाकिटावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पैठणचे आमदार तथा पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. तर हा फोटो लावण्यासाठी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी चार दिवस उशिरा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने सरकारने अवघ्या 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा केली होती. मात्र या वस्तू पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या पिशवीतून देण्यात येत आहे. दरम्यान या पिशव्यांवर स्टिकर लावण्याचे काम सुरु असल्याने आनंदाचा शिधा पोहचण्यास उशीर झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र आता औरंगाबादच्या पैठणमध्ये मंत्री भुमरे यांचा आणखी एक चौथा फोटो लावून आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे. विशेष म्हणजे असे करणारे भुमरे हे राज्यातील एकमेव मंत्री आहे.
सर्वसामान्यांच्या दिवाळीसाठी “आनंदाचा शिधा”
— Sandipan Bhumare (@SandipanBhumare) October 22, 2022
कोविड-19 च्या प्रार्दुभावानंतर दोन वर्षाने निर्बंधमूक्त दिवाळी आपण साजरी करीत आहोत, गोरगरिब नागरिकांसाठी आनंदाने व गोड पदार्थाने साजरी व्हावी यासाठी शासनाने “आनंदाचा शिधा” किटचे वाटप राज्यभर केले आहे....! pic.twitter.com/Kk8eRUcvKM
फोटोमुळे चार दिवस उशीर...
राज्यात आनंदाचा शिधा वाटपासाठी उशीर झाला असल्याचा आरोप करण्यात येत असतानाच पैठणमध्ये चार दिवस उशिरा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी केला आहे. आधीच तीन फोटो होते, मात्र चौथा आपलाही फोटो असावा म्हणून भुमरे यांनी तालुक्यातील सर्वच रेशन धारकांना आपला फोटो लावण्यात आलेल्या पिशवा पुरवण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे यासाठी चार दिवस उचीर झाला असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे.
फोटो लावणारे राज्यातील एकमेव मंत्री...
राज्यभरात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत. विशेष म्हणजे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांचा देखील फोटो नाही. मात्र पैठण तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर स्थानिक आमदार भुमरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर कोणत्याही मंत्र्याने आपल्या मतदारसंघात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर आपला फोटो लावलेला नाही.