Chandrakant Khaire: 'असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार'; खैरेंचा शिंदे गटाला इशारा
Chandrakant Khaire: 'शिंदे गटाच्या आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनाहून येऊ द्या, त्यानंतर असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार' असा इशारा खैरे यांनी दिला आहे.
Chandrakant Khaire On Shinde Group: शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला करत खोचक टीका केला आहे. 'शिंदे गटाच्या आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनाहून येऊ द्या, त्यानंतर असे हवन करतो की, तुमचे सरकार आऊटचं होणार' असा इशारा खैरे यांनी दिला आहे.
राज्यात आमचं सरकार येऊ दे पुन्हा सगळ्यांना घेऊन दर्शनाला येईन असा नवस कामाख्या देवीच्या दर्शनावेळी केला असल्याने आपल्या चाळीस समर्थक आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहे. दरम्यान यावरून उद्योगमंत्री उदय सामंत आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एकेमकांवर आरोप केले जात आहे. तर खैरेंनी आमच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला यावे, अशी ऑफर सामंत यांनी दिली आहे. त्यांच्या याच ऑफरला खैरे यांनी उत्तर दिले आहे.
तुम्ही आऊटचं होणार....
सामंत यांना उत्तर देतांना खैरे म्हणाले की, 'उदय सामंतांना माहित नाही की, मी 22 वर्षांपासून कामाख्या देवीच्या दर्शनाला जात असतो. तसेच शिंदे गटाचे आमदार जाऊन आल्यावर देखील मी कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने पूजा केली आणि म्हणून यांचे निर्णय लांबले होते. मी आध्यात्मिकवादी असल्याने भक्तिभावाने सर्वचकडे पूजापाठ करत असतो. मात्र माझ्या धर्मासाठी, पक्षासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी जात असतो. त्यामुळे यांना कामाख्या देवीच्या दर्शनाहून जाऊन तर येऊ द्या, त्यानंतर पहा मी कसा फटका मारतो. तिथे माझी अशी पूजा असेल की, तुम्ही आऊटचं होणार' असं खैरे म्हणाले.
मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार
तुम्हाला शिंदे गटात येण्यासाठी सामंत यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला सोबतच येण्याची ऑफर दिली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना खैरे म्हणाले की, मी कशाला शिंदे गटात जाईल, मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. माझ्या जिल्ह्यातील पाच आमदार गद्दार झाले, पण मी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलो. मी बाळासाहेबांचा ओरिजिनल शिवसैनिक आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांना मी अनकेदा सांगितले पण त्यांनी आयकलं नाही आणि सगळे गेले. त्यांच्या जाण्याने आम्हाला दुखः झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी एकटा संघर्ष करून भांडतोय. यांनी कितीतरी केलं तरीही आम्ही मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहोत. त्यामुळे न्यायालयाची तारीख येऊ द्या आणि 27 तारखेला मी हवन करणार असून त्यानंतर पहा काय होते असेही खैरे म्हणाले.