Farmers Protest: नुकसानभरपाई मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत साजरी केली 'दिवाळी'
Aurangabad: औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे.
Aurangabad News: औरंगाबादसह मराठवाड्यात परतीच्या पावसाने (Return Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची (Financial Help) गरज असतांना सरकारकडून फक्त घोषणा केल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केला आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज गावातील स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत अनोखं आंदोलन केलं.
यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कोणतीही शासकीय यंत्रणा पोहोचली नाही.त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही भरीव मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. अशात दिवाळी सारखा सण आला आहे, मात्र आमच्याकडे यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे गावातील सर्व शेतकरी आज स्मशानभूमीत दिवाळी साजरी करत असल्याचं निवेदनात म्हंटल आहे. तर यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
पंधरा दिवसांत मदत द्या...
यावेळी बोलतांना शेतकरी म्हणाले की, पहिल्यांदा औरंगाबाद जिल्ह्याला कृषिमंत्री पद मिळाले आहे. मात्र असे असतांना अजूनही ओला दुष्काळ सारखी परिस्थिती नसल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सांगतायत. त्यामुळे त्यांनी आमच्या भागात येऊन काय परिस्थिती आहे हे पाहावे. कापसाच्या झाडाला फक्त दोन कैऱ्या लागल्या आहे. त्यामुळे अशात कशी दिवाळी साजरी करणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे. सरकारचे आमच्यावर लक्ष नाही. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत सरकराने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली.
औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...
औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात अजूनही शेतात पाणी आहे. पीक पिवळी पडली आहे. तर सोयाबीन आणि मकाला कोंब फुटली आहे. तर कापसाच्या पिकाचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. बाजरी देखील हातून गेली आहे. अशात औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचा मोबदला जमा झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण सुद्धा बळीराजाला साजरा करता आला नाही. विशेष म्हणजे राज्याचे कृषीमंत्री औरंगाबाद जिल्ह्याचे आहे. असे असतांना औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होऊ शकला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Uddhav Thackeray: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करा: उद्धव ठाकरे यांची मागणी