(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी किती ठिकाणी पाहणी केली; अब्दुल सत्तारांना खैरेंचं उत्तर
Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली: चंद्रकांत खैरे
Aurangabad News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. तर उद्धव ठाकरे 24 मिनिटांत नुकसानीची कशी पाहणी करणार अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यांच्या याच टीकेला आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी किती ठिकाणी पाहणी केली याचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी आधी द्यावे, असा टोला खैरे यांनी लगावला आहे.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत. सत्तार म्हणतात मी 69 ठिकणी जाऊन आलो, पण जाऊन काय करून आलेत. तिथे जाऊन शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही असे सांगतायत. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच निवडून आले आहेत हे सत्तार यांनी विसरू नयेत असा टोला देखील खैरे यांनी लगावला आहे.
अब्दुल सत्तार आमचे पाया पडायचे...
निवडणुकीत निवडून आणण्यासाठी सत्तार माझे आणि उद्धव ठाकरे यांचे पाया पडायचे. मला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणा म्हणत पाया धरायचे. आता सत्तार यांना मस्ती आहे. त्यांना या पक्षातून त्या पक्षात फिरण्याची सवय असून, आता कोणत्या पक्षात जातील माहित नाही. त्यामुळे आता त्यांचा आम्ही बंदोबस्त करतो, असेही खैरे म्हणाले.