Amol Kolhe: जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हा आकसापोटी; अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
Amol Kolhe: राजकारण मर्यादा ओलांडत असून, खराब होतोय अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.
Amol Kolhe: औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली असून, हा गुन्हा आकसापोटी दाखल केल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे. अमोल कोल्हे औरंगाबादेत असून 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.
यावेळी बोलतांना खासदार कोल्हे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामुळं त्यांच्यामध्ये उद्विग्नता आलीय. लोकशाहीच्या दृष्टीने हे वाईट आहे. राजकारण मर्यादा ओलांडत असून, खराब होतोय अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. तर आकसापोटी असे राजकारण योग्य नाही, जनतेला हे अपेक्षित नाही. तर हे जेकाही सुरु आहे ते दुर्दैवी असल्याचं देखील कोल्हे म्हणाले.
तरचं जगदंबा तलवार आणण्याचा आनंद होईल...
लंडनच्या (Landan) संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याच्या प्रश्नावर बोलतांना अमोल कोल्हे म्हणाले की, लंडनवरून जगदंबा तलवार आणताय तो निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र शेतकरी ओला दुष्काळाची मागणी करतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना जे हवंय ते मायबाप सरकारने द्यायला हवं आणि त्याचवेळी ही तलवार आपण अभिमानाने आणतोय याचाही आनंद होईल असे अमोल कोल्हे म्हणाले.
अंबरनाथमधील प्रकार चुकीचं....
अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या अंधाधुंद गोळीबारच्या घटनेवर बोलतांना खासदार कोल्हे म्हणाले की, बैलगाडा शर्यतीत राजकारण जास्त येऊ नयेत. अंबरनाथमध्ये जे काही घडलं ते चुकीचे आहे. बैलगाडा शर्यत आपली संस्कृती असून, आपली परंपरा आहे. तर पुन्हा एकदा कोर्टात चुकीची काही मांडणी झाल्यास, आपली बाजू कमकुवत होऊ शकते. त्यामुळे आपली संस्कृती जपण्यासाठी योग्य पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील कोल्हे यांनी यावेळी केले.
कोल्हेंनी घेतली भुमरेंची भेट..
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले अमोल कोल्हे यांनी आज शिंदे गटाचे नेते तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांची भेट घेतली. भुमरे यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या कार्यालयात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी भुमरे यांनी त्यांचे स्वागत केले. तर दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती भुमरे यांनी दिली.