मोठी बातमी! आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी नाकारली, श्रीकांत शिंदेंना ग्रीन सिग्नल
Aurangabad : आदित्य ठाकरे यांना आता वेगळ्या ठिकाणी सभा घ्यावी लागणार आहे.
Aurangabad News:औरंगाबाद येथील सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, त्यांना सभास्थळ बदलण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी होणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर आदित्य ठाकरे यांना आता वेगळ्या ठिकाणी सभा घ्यावी लागणार आहे.
आदित्य ठाकरे यांची 7 नोव्हेंबरला सिल्लोड येथील महावीर चौकात सभा होणार होती. त्यासाठी ठाकरे गटाकडून सिल्लोड पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. तर त्याच दिवशी सिल्लोडच्या जिल्हा परिषद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील सभा होणार आहे. त्यांनी देखील यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी शिंदे यांच्या सभेला परवनागी दिली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या जागेवरून कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली आहे. तर आदित्य ठाकरे यांना आंबेडकर चौक, प्रियदर्शनी चौकाचे पर्याय देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची सभा आता आणखीच चर्चेत आली आहे.
यापूर्वी सत्तारांनी आदित्य ठाकरेंचं केलं होते जंगी स्वागत...
शिवसेनेतील बंडखोरीनंतर अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात जाने पसंद केले. मात्र त्याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जानेवारी महिन्यात आदित्य ठाकरे यांनी सिल्लोडचा दौरा केला होता. तर आदित्य ठाकरेंचं या दौऱ्यात अब्दुल सत्तार यांनी जंगी स्वागत केले होते. यावेळी सत्तार यांच्या समर्थकांनी देखील मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आता बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे सिल्लोडचा दौरा करणार आहे. पण यावेळी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध हा दौरा असणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा सिल्लोड दौरा चर्चेत आला आहे.
सत्तार यांच्याकडून शक्तिप्रदर्शन...
गेल्या काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान छोटा पप्पू म्हणून सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. सत्तार यांच्या आरोपाला थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी 7 नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये सभा घेण्याची घोषणा केली. आदित्य यांनी सभेची घोषणा करताच अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोडमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. आता शिंदे यांच्या सभेतून पुन्हा एकदा अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. सोबतच आदित्य ठाकरेंच्या सभेपेक्षा शिंदेंच्या सभेला अधिक गर्दी कशी जमवता येईल यासाठी देखील सत्तार यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे.