(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: औरंगाबाद परिमंडळात नऊ महिन्यांत दोन हजारपेक्षा अधिक वीजचोरांविरोधात कारवाई, 175 गुन्हे दाखल
Electricity Theft: गेल्या नऊ महिन्यांत वीजचोरी विरोधातील धडक मोहिमेत 2429 प्रकरणे उघडकीस आली आहेत.
Electricity Theft: वाढत्या वीजचोरीला रोखण्यासाठी महावितरणकडून आता धडक कारवाई करण्यात येत आहेत. तर महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळात गेल्या नऊ महिन्यांत वीजचोरी विरोधातील धडक मोहिमेत 2429 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात वीजचोरांना 4 कोटी 61 लाख रुपयांची बिले आकारण्यात आली आहेत. येत्या काळात ही बिले न भरल्यास वीजचोरांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरण ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायल मिळत आहे.
वाढती वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून सतत प्रयत्न केले जातात. यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या मोहीम राबवून वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाते. दरम्यान गेल्या नऊ महिन्यात देखील औरंगाबाद परिमंडळात अशीच काही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. ज्यात वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी करण्यात आल्या. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे निर्धारित बिल देण्यात आली आहे. तसेच सोबतच दंड (कंपाऊंडिंग चार्जेस) आकारला गेला. विशेष म्हणजे वीजचोरीचे निर्धारित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला महावितरणकडून मुदत दिली जाते. मात्र विहित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा नोंदविला जाणार आहे.
अशी केली जाते कारवाई!
मीटरमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी करणे, रिमोटच्या साह्याने मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, आकडा टाकणे अशा प्रकार वीजचोरी केली जाते. महावितरण सर्व ग्राहकांच्या मासिक वीजवापराचे नियमित विश्लेषण करत असते. यात काही ग्राहकांचा वीजवापर कमी झाल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांचा वीजवापर खरोखर कमी झाला आहे की, काही फेरफार केला याची पडताळणी महावितरणकडून केली जाते. यासाठी मोहीम राबवून वीजचोरांवर धडक कारवाई केली जात आहे.
नऊ महिन्यात चार कोटींची वीजचोरी
दरम्यान एप्रिल ते डिसेंबर-2022 या नऊ महिन्यात परिमंडळात 37 लाख 54 हजार 504 युनिटची 4 कोटी 61 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. यात 2421 वीजचोऱ्या या मीटरमध्ये छेडछाड व आकडे टाकून करण्यात आल्या आहेत. तर 108 प्रकरणांत भार बदल, अनधिकृत वापर असे प्रकार समोर आले आहेत. वीजचोरीचे बिल व दंडाची रक्कम न भरणाऱ्या वीजचोरांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत. औरंगाबाद परिमंडलात गेल्या नऊ महिन्यात वीजचोरी करणाऱ्यांवर 175 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
औरंगाबाद शहरात गोवर लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून; कमिश्नर टास्क फोर्स कमिटी बैठकीत निर्णय