Aurangabad: महेबूब यांना अडकवण्यासाठी मिळाले होते 'बॅग' भरून पैसे; पीडित तरुणीचा खुलासा
Aurangabad Crime News: याप्रकरणी औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad News: राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (mehebub shaikh) यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने केलेल्या नवीन खुलाशाने खळबळ उडाली आहे. भाजपच्या चित्रा वाघ (chitra wagh) आणि सुरेश धस (suresh dhas) यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर गुन्हा दाखल केल्यानंतर एका व्यक्तीने 'बॅग' भरून पैसे दिल्याचे सुद्धा या तरुणीने म्हटले आहे. याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नदमोद्दीन शेख आणि विशाल खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्चासाठी दिले 'बॅग' भरून पैसे
तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, नदमोद्दीन शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून व्हिडीओ बनवला. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मी जसे सांगेन तसं केल्यास आपण खूप पैसे कमवू असे सांगितले. त्यानंतर नदमोद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं तरुणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर नदमोद्दीन याने बीडमध्ये सुरेश धस, चित्रा वाघ आणि जिया बेग नावाच्या व्यक्तीसोबत भेट घालून दिली. त्यांनतर बेग याने पोलिसांनी त्रास देऊ नयेत आणि मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी 'बॅग' मध्ये पैसे दिले असल्याची माहिती तरुणीने दिली आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला आहे. या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार, "ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली होती. त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेख यांनी दाखवलं. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणीला मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.